सिंदेवाहीत गरबा व दांडिया स्पर्धेचे पुरस्कार वितरण
By admin | Published: October 17, 2016 12:48 AM2016-10-17T00:48:26+5:302016-10-17T00:48:26+5:30
येथील प्रभात बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने नवरात्रनिमित्त सिंदेवाही येथील समाज मंदिरात गरबा व दांडिया महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
निबंध स्पर्धाही आयोजित : विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद
सिंदेवाही : येथील प्रभात बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने नवरात्रनिमित्त सिंदेवाही येथील समाज मंदिरात गरबा व दांडिया महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. यानिमित्त आयोजित स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
यादरम्यान वन, वन्यप्राणी व पर्यावरण या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. तसेच पतंजली योग समितीतर्फे सकाळी निशुल्क योग व प्राणायम शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात आरोग्याबद्दल जनजागृती करण्यात आली. या संस्थेतर्फे नवरात्रनिमित्त गरबा व दांडीया स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते. ही स्पर्धा १ ते १३ आॅक्टोंबरपर्यंत घेण्यात आली. या स्पर्धेसाठी परीक्षकाकडून विजेत्या स्पर्धकांची निवड करण्यात आली. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक सागर बावनथडे यांनी पटकाविला. त्याला वाशिंग मशीन देण्यात आले. द्वितीय पुरस्कार सोनाली जाधव हिने पटकाविले. तिला २० इंची एलईडी टीव्ही, तृतीय क्रमांक कुमारी दोनाडकर हिला हिरो रेंजर सायकल व इतर सात विजेत्या स्पर्धकांना उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आले. या स्पर्धेव्यक्तीरिक्त दांडिया सजावट स्पर्धा घेण्यात आली. त्यात प्रथम क्रमांक सायली नागरगोजे हिने पटकाविला तर पब्लिक पोलमध्ये सुशील बावने सर्वात जास्त मतदान घेवून लोकप्रिय ठरला. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ लोनवाही ग्रा.पं. सरपंच गणेश गोलपल्लीवार, जि.प. सदस्य नागराज गेडाम, माजी सभापती अरविंद जैस्वाल, डॉ.सतीश चिंतावार, पोलीस निरीक्षक परघने, सहायक अभियंता झाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. विजेत्या स्पर्धकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
सर्वप्रथम संस्थेचे अध्यक्ष रितेश घुमे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. संचालन प्रज्ञा रामटेके व पोरस गेडाम यांनी केले. यशस्वीतेसाठी सुरेश रामटेके, संजय रामटेके, निखील डांगे, प्रशांत बनकर, हर्षल गुज्जनवार यांनी परिश्रम घेतले.(पालक प्रतिनिधी)