सिंदेवाहीची निवडणूक अखेर रद्द
By admin | Published: December 9, 2015 01:22 AM2015-12-09T01:22:17+5:302015-12-09T01:22:17+5:30
महाराष्ट्र शासनाने तालुका मुख्यालय असलेल्या सर्व गावांमध्ये नगरपंचायत गठित केली आहे. याला मात्र सिंदेवाही तालुका मुख्यालय अपवाद राहिले.
संघर्ष समितीला यश : सर्वच उमेदवारांची माघार
सिंदेवाही : महाराष्ट्र शासनाने तालुका मुख्यालय असलेल्या सर्व गावांमध्ये नगरपंचायत गठित केली आहे. याला मात्र सिंदेवाही तालुका मुख्यालय अपवाद राहिले. ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला होता. मात्र या निवडणूक प्रक्रियेवर नागरिकांनी बहिष्कार टाकला. त्या चार जणांनी नामांकन दाखल केले होते, त्यांनीही ते परत घेतल्याने ही निवडणूक प्रशासनाला अखेर रद्द करावी लागली आहे.
सिंदेवाही ग्रामपंचायत निवडणुकीच्या नामांकन भरण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वपक्षीय नेत्यांनी तातडीची बैठक घेऊन संघर्ष समिती स्थापन केली व निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. मात्र यापूर्वीच चार उमेदवारांनी आपले नामांकन दाखल केले होते. त्यामुळे हे चारही उमेदवार ग्रा.पं. निवडणुकीचे अर्ज मागे घेणार की नाही, याबाबत शंका होती.
मात्र नामांकन परत घेण्याच्या आज शेवटच्या दिवशी चारपैकी एक अर्ज छानणीमध्ये रद्द झाला तर तिघांनी सर्वासमोर गावाच्या विकासासाठी अर्ज मागे घेऊन सिंदेवाही ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार केला. सिंदेवाही नगरपंचायतीसाठी तालुका संघर्ष समितीच्या वतीने वॉर्डावॉर्डात जनजागृती करण्यात आली. त्यामुळे भाजपा, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी या पक्षातील ज्येष्ठ पदाधिकारी व सदस्यांनी एकत्रीत येवून गावांच्या विकासासाठी निवडणुकीवर बहिष्कार टाकला.
आम्हाला ग्रामपंचायत नको, नगरपंनचायत हवी, असा संदेश बहिष्काराच्या माध्यमातून शासनाला दिला. तालुका संघर्ष समितीने हे सर्व होवून शासन जागे न झाल्यास शासनाच्या विरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा मानस व्यक्त केला आहे. सिंदेवाही तालुक्याला हेतूपुरस्सर नगरपंचायतीच्या यादीतून डावलले जात असल्याचेही समितीने म्हटले आहे. त्यामुळे याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सिंदेवाहीकरांनी अखेर निवडणुकीवरच बहिष्कार टाकला. आता यामुळे प्रशासनालाही निवडणूक रद्द करावी लागणार आहे.
सिंदेवाही ग्रामपंचायत निवडणूक रद्द करण्यास सिंदेवाहीच्या नागरिकांनी तसेच राजकीय पक्षातील पदाधिकारी, सदस्य, व्यापारी मंडळ, तालुका संघर्ष समिती सदस्य, पत्रकारबंधू यांनी सहकार्य केले आहे. (शहर प्रतिनिधी)