२३३ गावांत सिंगल फेज योजना
By Admin | Published: June 25, 2014 12:24 AM2014-06-25T00:24:06+5:302014-06-25T00:24:06+5:30
मागील काही वर्षात महावितरणने पायाभूत आराखडा, गावठाण फिडर सेपरेशन, पुनर्रचित गतिमान विद्युत विकास कार्यक्रम असे उपक्रम राबवून वीज क्षेत्रात सुधारणा घडवून आणली.
चंद्रपूर : मागील काही वर्षात महावितरणने पायाभूत आराखडा, गावठाण फिडर सेपरेशन, पुनर्रचित गतिमान विद्युत विकास कार्यक्रम असे उपक्रम राबवून वीज क्षेत्रात सुधारणा घडवून आणली. महावितरणने घेतलेल्या दोन महत्वांच्या निर्णयामुळे आता सिंगलफेज आणि कृषीधारकांना लाभ होणार आहे.
जिल्ह्यातील २३३ गावांचा सिंगल फेजिंग योजनेत महावितरणने समावेश केला आहे. या सर्वच गावांना वीजवाहिन्याद्वारे विद्युतपुरवठा केला जाणार आहे.
पूर्वीप्रमाणे सिंगल फेजवर उपलब्ध होणारी तीन फेज वीज आता दुपारी आठ तास व रात्री दहा तासांऐवजी इतर घरगुती वीजवाहिन्याप्रमाणे होणार आहे. सिंगल फेज व कृषी फिडर्सना याचा लाभ होणार आहे. मात्र, वीज वाणिज्यिक व वितरण हानीचा निकष येथेही लागू होणार आहे. अ, ब, क, व ड गटातील वीज वितरण हानीप्रमाणे कमी असायला हवी अन्यथा येथेही भारनियमन हे जादा वीज वितरण आणि वाणिज्यिक हानीच्या इ, फ, व ग गटाप्रमाणे होणार आहे.
यापूर्वी इ, फ व ग गटातील वाहिनीवरील एखाद्या रोहित्रात बिघाड उत्पन्न झाल्यास त्या रोहित्रावरील ८० टक्के वीजबिलांचा भरणा झाल्याशिवाय ते रोहित बदलून देण्यात येत नव्हते. मात्र, ही अट आता शिथिल करण्यात आली असून, शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे.
महावितरणने घेतलेल्या या निर्णयास सकारात्मक प्रतिसाद देण्यासाठी कृषी व घरगुती ग्राहकांना वेळेवर वीजबिलांचा भरणा करावा लागणार आहे. दरम्यान जिल्ह्यातील मागील अनेक वर्षापासून डिमांड भरुनही कृषी पंपाना वीज दिली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विहीरी केवळ शोभेच्या वास्तू झाल्या होत्या. मात्र या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल, अशी शक्यता आहे. (नगर प्रतिनिधी)