साहेब, पैसे भरून पीकविमा दिला नाही, तर एक रुपयात काय द्याल! शेतकरीपुत्राचे थेट मुख्यमंत्र्यांना ट्विट

By साईनाथ कुचनकार | Published: June 2, 2023 04:02 PM2023-06-02T16:02:59+5:302023-06-02T16:14:21+5:30

मागील वर्षीचा पीक विमा अद्यापही मिळालाच नाही

Sir, if you don't pay crop insurance, what will you pay for one rupee! | साहेब, पैसे भरून पीकविमा दिला नाही, तर एक रुपयात काय द्याल! शेतकरीपुत्राचे थेट मुख्यमंत्र्यांना ट्विट

साहेब, पैसे भरून पीकविमा दिला नाही, तर एक रुपयात काय द्याल! शेतकरीपुत्राचे थेट मुख्यमंत्र्यांना ट्विट

googlenewsNext

चंद्रपूर : नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतीचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पीक विम्याच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळते; मात्र अनेकवेळा काही शेतकरी पैशांअभावी विमा काढण्याच्या भानगडीत पडत नाहीत. या सर्व शेतकऱ्यांना मदत व्हावी, शेतकऱ्यांचे कोणत्याही परिस्थितीत नुकसान होऊ नये यासाठी यावर्षीपासून शिंदे-फडणवीस सरकारने आता केवळ एक रुपयामध्ये पीक विमा देण्याचे घोषित केले; मात्र मागील वर्षी शेतकऱ्यांनी हजारो रुपये भरून पीक विमा काढला; मात्र अजूनही काहींना नुकसानभरपाई मिळाली नाही. त्यामुळे संतप्त शेतकरी पुत्राने थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्र्यांना ट्विट करीत पैसे भरून सुद्धा पीक विमा मिळाला नाही, तर एक रुपयांमध्ये खरंच विम्याची रक्कम देणार का, असा संतप्त प्रश्न उपस्थित केला आहे.

मागील वर्षी जिल्ह्यात पुराने थैमान घातले. दोन ते तीन वेळा पुरामध्ये अनेक शेतकऱ्यांचे शेत बुडाले. यामध्ये मोठे नुकसान झाले. प्रशासनाने विमा कंपनीद्वारे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन दिले; मात्र जिल्ह्यातील काहीच शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळाली आहे. आजही अनेक शेतकरी विमा मिळेल, या आशेवर आहेत. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ एक रुपया शुल्कामध्ये शेतीचा विमा काढण्याचे जाहीर केले. या योजनेमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे; मात्र मागील वर्षी हजारो रुपये भरून आणि शेतीचे नुकसान होऊनही अजूनही विम्याचे पैसे मिळाले नसल्याने पुढील वर्षी एक रुपयांमध्ये खरंच विमा मिळणार का, हा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, अन्नदाता एकता मंचचे संस्थापक शेतकरी पुत्र अनुप खुटेमाटे यांनी थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना ट्विट करीत,‘अहो साहेब, आम्ही पैसे भरून सुद्धा आपण पीक विमा नुकसानभरपाई ३१ मे लोटूनसुद्धा दिली नाही. मग एक रुपयात काय द्याल आम्हाला. साहेब, आम्ही शेतकरी सुद्धा हिंदू आहोत, आम्ही सुद्धा पीक विमा न मिळाल्यामुळे धोक्यात आहोत. असे ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

३१ मे उलटला मात्र पैसे नाही 

पीक विमा मिळाला नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी प्रशासनाला निवेदन दिले होते. दरम्यान, कृषी मंत्र्यांनी ३१ मेपर्यंत विम्याचे पैसे मिळेल, असे आश्वासन विधानसभेत दिले होते; मात्र अजूनही अनेकांच्या खात्यात पैसेच जमा झाले नाहीत.

Web Title: Sir, if you don't pay crop insurance, what will you pay for one rupee!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.