साहेब, घरकुल योजनेचे उर्वरित अनुदान कधी मिळेल हो ?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 01:55 PM2024-08-27T13:55:38+5:302024-08-27T14:05:04+5:30
Chandrapur : नागभीड तालुक्यातील अनेक घरकुल स्लॅब लेव्हलपर्यंतच
राजेश बारसागडे
लोकमत न्यूज नेटवर्क
सावरगाव : संपूर्ण नागभीड तालुक्यातील अनेक गावांतील राहायला घर नसलेल्या गरीब नागरिकांसाठी शासनातर्फे मोदी आवास घरकुल योजना अमलात आणली आणि प्रपत्र ड मध्ये नाव आलेल्या गरजू लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले आणि पहिला व दुसराही हप्ता देण्यात आला. लाभार्थ्यांनी तातडीने घरकुलाचे काम सुरू केले आणि घर स्लॅब लेव्हलपर्यंत बांधूनही झाले आहे. मात्र, मागील जवळपास अडीच ते तीन महिन्यांपासून तिसरा हप्ता न मिळाल्याने घरकुल लाभार्थ्यांचे बांधकाम रखडले आहे.
दरम्यान, राहायला घर नसलेल्या आणि कुठेतरी आसरा घेतलेल्या, तर काही गरीब लाभार्थी ताडपत्री टाकून तिथेच गुजरान करीत असलेल्या लाभार्थ्यांना तालुक्यात धो-धो पडणाऱ्या पावसामुळे मोठी संकटकालीन परिस्थितीचा सामना करावा लागता आहे.
तालुक्यातील गरजू आणि घरापासून वंचित असलेल्या गरीब लाभार्थ्यांना मोदी आवास योजने अंतर्गत एक लाख ३० हजार आणि रोजगार हमी योजनेतून १८ हजार असे एकूण एक लाख ४८ हजार रुपये शासनाकडून घरकुल बांधकामासाठी अनुदान दिले जाते. घरकुल बांधकामासाठी पहिला हप्ता २० हजार व दुसरा हप्ता ४५ हजार असे एकूण ६५ हजार रुपये लाभार्थ्यांना देण्यात आले. परंतु शहरापासून ते खेड्यापर्यंत आलेल्या सध्याच्या महागाईच्या काळात सिमेंट, विटा, रेती, सळाख, बांधकाम कारागीर आणि मजुरीचा खर्च लक्षात घेता दोन खोलींचा पायवा व स्लॅबपर्यंत बांधकाम करायला एक ते दीड लाख रुपयांचा खर्च येतो. तरीही एकदाचे घर व्हावे म्हणून लाभार्थ्यांनी इकडून तिकडून उसनवार करून तर कुणी इतरत्र कर्ज काढून घरकुलाचे स्लॅबपर्यंत बांधकाम पूर्ण केले. दुकानदारांनीही उधारीत सामान दिले. मात्र, आता पुढील कामासाठी पैसे हवे आहेत.
परंतु, मोदी आवास योजनेचा अडीच ते तीन महिन्यांपासून तिसरा हप्ता रखडला असल्याने घरकुल स्लॅब लेवलपर्यंत येऊन थांबलेले असून, घरकुलांच्या भिंती मुसळधार पावसात भिजत आहे. त्यामुळे लाभार्थी मोठ्या जीवघेण्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत आणि राहायला घर नसल्याने पावसात त्यांना मोठ्या दुर्धर अवस्थेतून जीवन कंठावे लागत आहे.
त्यामुळे शासनाने तातडीने घरकुल लाभार्थ्यांसाठी निधी उपलब्ध करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. सद्यःस्थितीत नागभीड तालुक्यात ६०० घरकुलाचे बांधकाम सुरू आहे. यातील काही घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी त्याची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. उर्वरित बहुतांश घरकुलाचे बांधकाम निधीअभावी थांबले आहे. त्यांना निधीची अत्यंत आवश्यकता आहे.
प्रतीक्षा यादीतील लाभार्थी घरकुलपासून वंचितच
केंद्र शासनाची पूर्वीची पंतप्रधान आवास योजना असताना आणि त्यातून "प्रपत्र ड" मध्ये नाव नोंद झाले असताना शासनाने मोदी आवास योजना काढली आणि त्या माध्यमातून लाभार्थ्यांना घरकुल बांधून दिली जात आहेत. मात्र, मोदी आवास योजनेतील निकषात आवास प्लसमधील प्रतीक्षा यादीत नाव असलेल्या मात्र, ऑटोमॅटिक सिस्टीमद्वारे रिजेक्ट झालेल्या गरीब लाभार्थ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात आले असतानासुद्धा त्यांना अजूनही घरांपासून वंचित राहावे लागत असल्याचे तालुक्यातील अनेक गावांतील लाभार्थ्यांचे म्हणणे आहे.
तालुक्यात ६०० घरकुलाचे बांधकाम
याबाबतीत पंचायत समितीअंतर्गत घरकुल विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क केला असता त्यांनी घरकुल बांधकामाचा निधी रखडल्याची समस्या ही संपूर्ण महाराष्ट्राची आहे. सद्यःस्थितीत नागभीड तालुक्यात ६०० घरकुलांचे बांधकाम सुरू आहे. येत्या काही दिवसांत निधी उपलब्ध होण्याची प्रोसेस सुरू आहे. निधी उपलब्ध झाल्यास तातडीने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल. असे सांगितले.
"जवळपास तीन महिन्यांपासून गरीब लाभार्थ्यांच्या घरकुलांचे बांधकाम रखडले आहे. त्यामुळे त्यांची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे. घर बांधकामासाठी लागणारे साहित्य दिवसेंदिवस महाग होत चालले आहे. त्यामुळे शासनाने तातडीने लाभार्थ्यांच्या उर्वरित घरकुल निधी उपलब्ध करावा."
- खोजराम मरस्कोल्हे, माजी जि. प. सदस्य, जिल्हा परिषद, चंद्रपूर.