साहेब! शैक्षणिक धडे शिकवायला गुरुजी येणार का ?
By admin | Published: July 7, 2015 01:07 AM2015-07-07T01:07:24+5:302015-07-07T01:07:24+5:30
मागील वर्षी संत्र संपले. पण शिक्षकांची रिक्त पदे भरण्याचे सौजन्य शिक्षण विभागाने दाखविले नाही...
विद्यार्थी कसे घडतील ? : गुरुजी न आल्यास अनेक शाळांना लागणार कुलूप
जिवती: मागील वर्षी संत्र संपले. पण शिक्षकांची रिक्त पदे भरण्याचे सौजन्य शिक्षण विभागाने दाखविले नाही आणि यावर्षीचे सत्र सुरु होऊन आठवडा लोटला तरी पहाडावरील अनेक शाळेला गुरुजी मिळाले नाही. नवीन गुरुजी देण्याच्या शिक्षण विभागाकडून काही हालचालीसुद्धा दिसत नसल्याने पहाडावरील विद्यार्थ्यांना सांभाळताना कार्यरत तुटपुंज्या शिक्षकांना कसरत करावी लागत आहे. असाच एकोप्याने धडे घेण्याचा गंभीर प्रकार काही दिवस चालल्यास पहाडावरील अनेक शाळांना कुलूप लावण्याची वेळ येईल, असे पालकांकडून बोलले जात आहे.
ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी विभाग जनजागृती करताना दिसत आहे. मात्र शाळेत नियमित येणाऱ्या विद्यार्थ्यांना अजूनही विषयानुसार शिकवायला गुरुजी मिळाला नाही. याकडे मात्र शिक्षण विभागाचा कानाडोळाच झाल्याचे दिसत आहे. लोकमत प्रतिनिधीने पहाडावरील काही शाळांना भेटी दिल्या असता गंभीर प्रकार पहायला मिळाला. कुठे वर्ग ५ तर कुठे वर्ग ७ आणि विविध विषयांना शिकवणारे गुरुजी मात्र दोनच असल्याने शाळेतील गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळली जात असल्याचा प्रकार दिसत आहे. असे असतानाही शिक्षण विभागाला जाग आली नाही. ज्या शाळेतून गुणवत्ताधारक विद्यार्थी घडत होते. आज त्याच शाळेतील वाढती विद्यार्थी संख्या आणि शिक्षकाची रिक्त पदे यामुळे कार्यरत गुरुजींना गुणवत्ताधारक विद्यार्थी घडविताना अपयशी ठरावे लागत आहे. विद्यार्थ्यांना शिकविण्याबरोबरच शिक्षकांना जनगणना, मतदानाचे काम, शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा सर्वे इत्यादी कामामुळे शिक्षकांवर ताण पडत असल्याने शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे.
तालुक्यातील देवलागुडा, येल्लारपूर (खु.), मरकलमेंढा, गुडसेला, रायपूर, परमडोली, कमलापूर, आदी गावातील जि.प. शाळेला अद्यापही शैक्षणिक धडे शिकवायला गुरुजी मिळाले नाही. मागील वर्षी अनेक वेळा शिक्षण विभागाकडे गुरुजी द्या, अशी लेखी, तोंडी मागणी केली. मात्र दखल घ्यायला कुणालाही वेळ मिळाला नाही. यावर्षीही सत्राचा आठवडा संपला. मात्र गुरुजींचा पत्ता नाही. शिक्षण विभाग अजून किती दिवस हा तमाशाचा फड चालविणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून ऐकायला मिळत आहे. शहरातील विद्यार्थ्यांचा कल दिवसेंदिवस इंग्रजी माध्यमात शिकण्याकडे जात असून ग्रामीण भागात मात्र इंग्रजी माध्यम तर सोडाच पण मराठीचे धडे शिकवायलाही गुरुजी मिळत नसल्याने जिल्हा परिषद शाळेची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालल्याचे दिसत आहे. (तालुका प्रतिनिधी)