साहेब, तुम्हीच म्हणाल ‘ट्रेनला प्रवासी मिळत नाही’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2022 05:00 AM2022-07-18T05:00:00+5:302022-07-18T05:00:16+5:30
रेल्वे विभागाने मुंबईला जाण्यासाठी बल्लारशाह - एलटीटी ही साप्ताहिक समर स्पेशल ट्रेन सुरु केली आहे. मात्र, या ट्रेनचा शेगाव, मनमाळ, जळगाव आदी ठिकाणी स्टाॅप नसल्याने प्रवाशांची मोठी अडचण होत आहे. या ट्रेनला स्टाॅप दिले नसल्याने प्रवासी मिळत नसल्याची स्थिती आहे. परिणामी भविष्यात नियमित ट्रेन सुरु करण्याची वेळ आल्यास प्रवासी मिळत नसल्याची ओरड अधिकारी करू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : बल्लारशाह - मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस कोरोना संकटापासून बंद आहे. ती आजही सुरु झाली नाही. परिणामी येथील प्रवाशांना मुंबईला जाणे कठीण झाले आहे. दरम्यान, रेल्वे विभागाने मुंबईला जाण्यासाठी बल्लारशाह - एलटीटी ही साप्ताहिक समर स्पेशल ट्रेन सुरु केली आहे. मात्र, या ट्रेनचा शेगाव, मनमाळ, जळगाव आदी ठिकाणी स्टाॅप नसल्याने प्रवाशांची मोठी अडचण होत आहे. या ट्रेनला स्टाॅप दिले नसल्याने प्रवासी मिळत नसल्याची स्थिती आहे. परिणामी भविष्यात नियमित ट्रेन सुरु करण्याची वेळ आल्यास प्रवासी मिळत नसल्याची ओरड अधिकारी करू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
शेगाव, शिर्डीला देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. मात्र, समर स्पेशल ट्रेनला शेगाव, मनमाळ आणि जवळगाव येथे स्टाॅप दिले नाहीत. त्यामुळे ट्रेन असूनही भाविकांना दर्शनासाठी जाता येत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे येथे स्टॉप देऊन आठवड्यातून किमान तीन दिवस ट्रेन चालविण्याची मागणी करण्यात आली आहे.
-श्रीनिवास सुंचूवार
झेडआरयुसीसी सदस्य, चंद्रपूर
सेवाग्राम अजूनही बंदच
औद्योगिक जिल्हा असल्याने चंद्रपूर ते मुंबई असा प्रवास करणारे बरेच प्रवासी आहेत. मात्र, कोरोना संकटापासून सेवाग्राम ही मुंबईला जाण्यासाठी असलेली हक्काची ट्रेन बंद करण्यात आली.
शेगाव, मनमाळ, जळगावला थांबा द्या
मुंबईला जाण्यासाठी थेट ट्रेन नसल्याने रुग्णांचेही बेहाल होत आहेत. दरम्यान, यावर उपाय म्हणून बल्लारशाह - लोकमान्य टिळक टर्मिनल (साप्ताहिक) ट्रेन दर बुधवारी सुरु करण्यात आली आहे. ही ट्रेन बुधवारी १२ वाजताच्या सुमारास बल्लारशाह येथे पोहोचत असून, बुधवारीच १.४० वाजता मुंबईसाठी निघते. मात्र, या ट्रेनला शेगाव, मनमान, जवळगाव येथे स्टाॅप देण्यात आले नाहीत. त्यामुळे शेगाव, शिर्डी, जळगाव येथे जाणाऱ्या प्रवाशांनी काय करावे, हा प्रश्न आहे. विशेष म्हणजे, शेगाव, शिर्डीला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. मात्र, ट्रेनच नसल्याने त्यांनासुद्धा जाता येत नाही. विशेष म्हणजे, सेवाग्राम ट्रेन सुरु असताना या स्ट्राॅपवर मोठ्या संख्येने प्रवासी ये-जा करीत होती. आता रेल्वेने नियमित ट्रेन सुरु करण्याचा विचार केल्यास प्रवासीच मिळत नसल्याचे कारण अधिकारी देऊ शकतात. शेगाव, मनमाळ, जळगाव येथे समर स्पेशल ट्रेनचा स्टाॅप देण्याची मागणी केली जात आहे.