पाण्याअभावी चंद्रपूरकरांच्या जीवाचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 11:24 PM2018-03-27T23:24:22+5:302018-03-27T23:24:22+5:30

गतवर्षीच्या अत्यल्प पावसाने नैसर्गिक जलसाठे पूर्णत: भरले नाहीत. त्यामुळे मार्च महिन्यातच उन्हाची दाहकता वाढत असताना चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

The situation of Chandrapurkar's life due to lack of water | पाण्याअभावी चंद्रपूरकरांच्या जीवाचे हाल

पाण्याअभावी चंद्रपूरकरांच्या जीवाचे हाल

Next
ठळक मुद्देबाबुपेठला सात दिवसानंतर मिळाले पाणी : इतर वॉर्डातही तीन ते चार दिवसांनी पाणी पुरवठा

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : गतवर्षीच्या अत्यल्प पावसाने नैसर्गिक जलसाठे पूर्णत: भरले नाहीत. त्यामुळे मार्च महिन्यातच उन्हाची दाहकता वाढत असताना चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. चंद्रपूर शहरासाठी जीवनदायिनी असलेल्या इरई धरणाने तळ गाठल्याने १ मार्चपासून दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे मनपाने जाहीर केले. मात्र प्रत्यक्षात अनेक वॉर्डाला दोन ते तीन दिवसांनी पाणी पुरवठा केला जात आहे. तर गेल्या सात दिवसानंतर मंगळवारी बाबुपेठला पाणी पुरवठा करण्यात आला. त्यामुळे चंद्रपूरकरांचे पाण्यासाठी हाल होताना दिसत आहे.
इरई धरणाद्वारे चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा केला जाते. मात्र यावर्षी इरई धरण पूर्णत: भरले नाही. सध्यास्थितीत इरई धरणात १५ ते १६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहेत. त्यामुळे दररोज शहराला पाणी पुरवठा करणे शक्य नसल्याने १ मार्चपासूनच दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे मनपाने निश्चित केले. मात्र त्यानंतरही अनेक वॉर्डात पाणी पुरवठा करण्यात अनियमितता आहे. काही वॉर्डाला दिवसाआड तर काही वॉर्डाला दोन ते तीन दिवसानंतर पाणी पुरवठा होत आहे. अशातच बाबुपेठ वॉर्डाला गेल्या सात दिवसानंतर मंगळवारी पाणी पुरवठा करण्यात आला.
ज्यांच्या घरी पाण्यासाठी नळाशिवाय इतर कोणतेही स्त्रोत नाही, त्यांना तीव्र पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. दोन दिवसाआड पाणी पुरवठा होत असला तरी पाण्याची धार कमी आणि लवकरच पाणी पुरवठा बंद होत असल्याने रोष व्यक्त केला जात आहे.
अशातच काही नागरिकांनी बोअर खोदणे सुरू केले आहे. मात्र ४०० फुटापर्यंतही पाणी लागत नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत असल्याची स्थिती बघायला मिळत आहे.

वीज केंद्राचे पाणी बंद करा : जोरगेवार
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : शहरात गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याची भीषण टंचाई सुरु आहे. त्यामुळे सीटीपीएस बंद करून चंद्रपूर शहराला नियमित पाणी पुरवठा करावा, अशी मागणी शिवसेना नेते किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे. मागणी मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. यावेळी जिल्हाधिकारी यांनी एक समिती गठित करून समितीद्वारे इरई धरणाच्या पाण्याची पातळी तपासली जाईल. त्यानंतरच सीटीपीएस बंद करण्याचा निर्णय घेऊ, असे आश्वासन जोरगेवार यांना दिले. यावेळी विशाल निंबाळकर, आकाश साखरकर, माया पटले, अब्बासभाई, रुपेश पांडे आदींची उपस्थिती होती.
महिनाभराच्या पाण्याचा सीटीपीएसकडून दोन दिवसातच वापर
सीटीपीएस मधील सर्व संच दोन दिवसांसाठी बंद केले तर चंद्रपूर शहराला दोन महिने पाणी पुरवठा होऊ शकते. शहरातील जनतेला दररोज ४१ लक्ष (घनमीटर) पाणी वापरण्यासाठी लागते आणि जेवढे पाणी शहरातील जनतेला महिन्याभरासाठी लागते तेवढेच पाणी सीटीपीएस एका दिवसात वीज निर्मिती करण्याकरिता वापरतो. चंद्रपूर शहरातील पाणी पुरवठा योजना बीओटी तत्वावर खासगी कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आली तेव्हापासून शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत होत आहे.

Web Title: The situation of Chandrapurkar's life due to lack of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.