इंग्रजी माध्यमांच्या शाळांना मराठीच्या सहा तासिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 05:00 AM2020-06-23T05:00:00+5:302020-06-23T05:00:18+5:30
विनाअनुदानीत कायमस्वरूपी विनाअनुदानित व सीबीएसईसह सर्व व्यवस्थापन व माध्यमांच्या शाळांमध्ये २०२०-२१ या शैक्षणिक सत्रापासून मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्याचा आदेश जारी केला. एमएसईआरटीच्या परित्रकानुसार इंग्रजी माध्यमांच्या इयत्ता पहिली ते नववीपर्यंच्या सर्व वर्गांना आठवड्यातून मराठीच्या सहा आणि दहावीकरिता चार तासिका अनिवार्य आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सर्व शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मराठी भाषेची आवड निर्माण व्हावी, यासाठी शासनाने अनुदानीत, विनाअनुदानीत कायमस्वरूपी विनाअनुदानित व सीबीएसईसह सर्व व्यवस्थापन व माध्यमांच्या शाळांमध्ये २०२०-२१ या शैक्षणिक सत्रापासून मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्याचा आदेश जारी केला. एमएसईआरटीच्या परित्रकानुसार इंग्रजी माध्यमांच्या इयत्ता पहिली ते नववीपर्यंच्या सर्व वर्गांना आठवड्यातून मराठीच्या सहा आणि दहावीकरिता चार तासिका अनिवार्य आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी सर्व शाळांना सूचना दिल्या आहेत.
मराठी भाषा हा विषय शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून इयत्ता पहिली व सहावीमध्ये सुरू होणार असून चढत्या क्रमानुसार पुढील वर्गात लागू करण्यात येणार आहे. यातूनच टप्प्याटप्प्याने सर्व माध्यमाच्या सर्व शाळांमध्ये मराठी हा विषय पहिली ते दहावीपर्यंत एक सक्तीचा विषय म्हणून शिकविला जाईल.
सर्व शाळांमध्ये मराठी बोलण्यावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे कोणतेही निर्बंध लादता येणार नाही. सोबतच मराठी भाषा बोलणाऱ्यावर निर्बंध लादणारा कोणताही फलक किंवा सूचना देता येणार नाही. प्रचलित अभ्यासक्रम व विषय योजनाअंमलबजावणीनुसार सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या राज्य अभ्यासक्रम राबवित असलेल्या मराठी, इंग्रजी व इतर माध्यमांच्या शासकीय, अनुदानित व खासगी अशा सर्व मान्यताप्राप्त शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा राहील, असे शासनाचे निर्देश असून तशा सूचना शाळांना दिल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली.
इतर माध्यमांच्या शासकीय, अनुदानित व खासगी अशा सर्व मान्यताप्राप्त शाळांमध्ये मराठी या विषयाची उपेक्षा करण्यात आली आहे. मराठीत आता अत्यंत दर्जेदार साहित्य उपलब्ध आहे. मुलांच्या जाणिवा वैश्विक करण्यासाठी या निर्णयाची गरज होती.
- प्रा. डॉ. इसादास भडके
मराठी भाषा अभ्यासक, चंद्रपूर
इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय ज्ञान भाषा आहे. मात्र, जगभरात ज्ञान भाषा म्हणून बोलींकडेही पाहिले जात आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये या विषयाकडे गंभीरतेने पाहिले जाईल का प्रश्नच आहे. खरे तर भाषा अभ्यासातून रोजगार मिळेल का, याचाही विचार व्हावा.
- योगेश चामटे,
मराठी शिक्षक, चंद्रपूर
-अन्यथा शाळांना दंड अथवा मान्यता रद्द
शासनाच्या आदेशाने जिल्ह्यातील सर्व शाळांना मराठी विषय विद्यार्थ्यांना शिकविण्याबद्दल सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या शाळा एक सक्तीचा विषय म्हणून यापुढे मराठी शिकविणार नाही, अशा शाळेतील कामकाजाचे व्यवस्थापन करण्यासाठी जबाबदार असलेल्या व्यवस्थापकीय संचालक किंवा संबंधित व्यक्तीला एक लाख रुपयाचा दंड तसेच शाळेची मान्यता किंवा ना-हरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात येणार असल्याच्या सूचना जि. प. शिक्षण विभागाने दिल्या आहेत.