बँकेची तिजोरी फोडून सहा लाखांची रोकड, १०० ग्रॅम सोने पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:26 AM2021-03-21T04:26:30+5:302021-03-21T04:26:30+5:30

वरोरा/टेमूर्डा : वरोरा तालुक्यातील टेमूर्डा येथे नागपूर-चंद्रपूर महामार्गालगत असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत चोरट्यांनी दरोडा घातला. अज्ञात दरोडेखोरांनी गॅसकटरने ...

Six lakh cash and 100 grams of gold were snatched from the bank vault | बँकेची तिजोरी फोडून सहा लाखांची रोकड, १०० ग्रॅम सोने पळविले

बँकेची तिजोरी फोडून सहा लाखांची रोकड, १०० ग्रॅम सोने पळविले

Next

वरोरा/टेमूर्डा : वरोरा तालुक्यातील टेमूर्डा येथे नागपूर-चंद्रपूर महामार्गालगत असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत चोरट्यांनी दरोडा घातला. अज्ञात दरोडेखोरांनी गॅसकटरने तिजोरी कापून त्यातील सहा लाखांची रोकड व १०० ग्रॅम सोने लंपास केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही घटना शनिवारी सकाळी सात वाजता उघडकीस आली. घटनेची माहिती होताच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. बँकेची तिजोरी फोडून एवढी मोठी रक्कम पळविल्याची ही अलीकडच्या काळातील मोठी घटना आहे.

टेमूर्डा या गावात बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा ग्रामपंचायत लगतच्या आवारात आहे. सकाळी बँकेचा शिपाई पराग सोयाम हा नेहमीप्रमाणे साफसफाई करण्यासाठी गेला असता त्याला बँकेचे मुख्य प्रवेशद्वार उघडे दिसले. ही माहिती त्याने लगेच शाखा व्यवस्थापक राणी मेश्राम यांना दिली. मेश्राम यांनी वरोरा पोलिसांना याबाबत अवगत केले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला असता बँकेच्या मागील लोखंडी खिडकीचे गज गॅसकटरने तोडून दरोडेखोरांनी आत प्रवेश केला. अलार्म वायर तोडले. सीसीटीव्ही कॅमेरे तोडून बाहेर फेकले. नंतर तिजोरी गॅस कटरने कापून त्यातील अंदाजे सहा लाखांची रोकड व सोने घेऊन बँकेच्या मुख्य प्रवेशद्वारातून दरोडेखोर निघून गेल्याचा अंदाज आहे. बँकेपासून काही अंतरावरील शेतात दरोडेखोरांनी वापरलेले गॅस सिलिंडर सापडले. नंतर ते वाहनाने फरार झाल्याची शक्यता उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश पांडे यांनी वर्तवली. बँकेलगतच्या एटीएमला चोरी झाल्याच्या रात्री दीड वाजता पोलीस पथकाने भेट देऊन पाहणी केल्याचा अहवालही वरिष्ठांना सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली. घटनास्थळाला पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी भेट दिली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश पांडे, वरोराचे पोलीस निरीक्षक दीपक खोबरागडे, स्थानिक गुन्हे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे आपल्या चमूसह उपस्थित होते. पोलिसांनी बँकेतील सीसीटीव्ही फुटेज सीडीआर ताब्यात घेतला आहे.

स्मशानभूमीतून सोम परतला

घटनास्थळी ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. सोम नावाचा श्वान बँकेपासून भटाळा रोडलगतच्या स्मशानभूमीपर्यंत गेला. पुढील मार्ग सोमला गवसला नसल्याने स्मशानभूमीपासून तो परत आला.

बँकेत चारवेळा चोरीचा प्रयत्न

बँकेत ८ मार्च २००६, २००९, ८ फेब्रुवारी २०११ व ५ जानेवारी २०१९ मध्येही चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला होता. दरम्यान, चोरटे बँकेच्या आत शिरले, परंतु त्यांच्या हाती काहीही लागले नव्हते. याबाबत वरोरा पोलीस ठाण्याला तक्रारीदेखील करण्यात आल्या. जानेवारी २०१९ मध्ये बँकेचे दार तोडताना आवाज झाल्याने रात्री एकजण तिथे आला असता चोरट्यांनी त्याला बांधून ठेवल्याची घटना घडली होती, अशी माहिती टेमूर्डा पोलीस पाटील पंढरी देवगडे यांनी दिली. मात्र, पाचव्यांदा चोरीचा प्रयत्न यशस्वी झाल्याचे मानले जात आहे.

वरोराची पोलीस यंत्रणा नावालाच

गेल्या काही दिवसांपासून वरोरा तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. वरोरा शहरात भरदिवसा चार घरफोड्या झाल्या. एका दुचाकीस्वाराला साडेतीन लाखांना लुटले. यातील एकाही घटनेचा छडा लावण्यात वरोरा पोलिसांना यश आले नाही. येथील पोलीस दारूविक्रेत्यांचे पाठीराखे झाल्याचा सूर सर्वत्र आहे. दोन दिवसांपूर्वी बोर्डा चौकीत दारू विकणाऱ्याला सोडून चिरीमिरीसाठी एका भलत्याच दुकानावर छापा घातला. मात्र, हाती काहीच न लागल्याने परतले; परंतु बाजूला दारू विक्री करणाऱ्याकडे ढुंकूनही पाहिले नसल्याची शहरात चर्चा आहे. दुसरीकडे पाेलिसांच्या नाकावर लिंबू टिच्चून चोरटे हात साफ करीत असताना येथील पोलीस मात्र हातावर हात ठेवून असल्यानेच हा दरोडा पडल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Six lakh cash and 100 grams of gold were snatched from the bank vault

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.