मालमत्ता कर भरण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 05:00 AM2020-07-01T05:00:00+5:302020-07-01T05:01:07+5:30
महापौर राखी कंचर्लावार यांच्या उपस्थितीत मंगळवारी सोशल डिस्टन्सिंग पाळून आमसभा घेण्यात आली. यावेळी गुंठेवारी प्रकरणावरून विरोधी पक्षातील नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. गुंठेवारी प्रकरणाला २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे नगरसेविका सुनिता लोढीया यांनी मुदतवाढीला आक्षेप नोंदवला. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गुंठेवारी प्रकरणे निकाली काढू असे आश्वासन आयुक्त राजेश मोहिते यांनी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनामुळे नागरिकांच्या उत्पन्नाचे मार्ग बंद होते. परिस्थिती पूर्ववत येण्यासाठी कालावधी लागणार आहे. त्यामुळे मालमत्ता कर भरण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महानगर पालिकेने मंगळवारी सर्वसाधारण सभेत घेतला. विशेष म्हणजे, मालमत्ताधारकांकडून कुठलेही व्याज व शास्ती आकारण्यात येणार नाही.
महापौर राखी कंचर्लावार यांच्या उपस्थितीत मंगळवारी सोशल डिस्टन्सिंग पाळून आमसभा घेण्यात आली. यावेळी गुंठेवारी प्रकरणावरून विरोधी पक्षातील नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. गुंठेवारी प्रकरणाला २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे नगरसेविका सुनिता लोढीया यांनी मुदतवाढीला आक्षेप नोंदवला. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गुंठेवारी प्रकरणे निकाली काढू असे आश्वासन आयुक्त राजेश मोहिते यांनी दिले. १५३ गुंठेवारीची प्रकरणे मंजूर करण्यात आली. २ हजार ५१२ पैकी २ हजार १३७ प्रकरणे आरक्षित जागेवरील आहेत. ३८१ प्रकरणे अनारक्षित जागेवरील असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. नझुलच्या जागा मनपाने ताब्यात घ्याव्यात, अशा सूचना अंजली घोटेकर यांनी दिल्या. त्यावर नगरसेवक दीपक जयस्वाल यांनी तुम्ही महापौर असताना त्या जागा ताब्यात का घेतल्या नाहीत, असा प्रतिप्रश्न केला. सभेला सुरूवात होताच बंधकामाच्या निविदा प्रक्रियेत घोळ होत असल्याचा आक्षेप विरोधी पक्षातील नगरसेवकांनी नोंदविला. त्यावर संदीप आवारी यांनी त्या निविदा आॅनलाईन असतात. त्यात आपण स्वत:च घोळ करून दाखवावा, असे आव्हान दिले.
शाळांच्या समायोजनाला नगरसेवकांचा विरोध
मनपाच्या काही शाळांची पटसंख्या कमी आहेत. त्यामुळे त्या शाळांचे समायोजन करण्यात यावे, असा प्रस्ताव सभागृहात ठेवण्यात आला. त्यावर नगरसेवकांनी विरोध दर्शवला. शाळांमध्ये शिक्षक नसल्याने पटसंख्या कमी होत आहे. त्यामुळे मानधन तत्वावर शिक्षकांची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवकांनी रेटून धरली. अखेर सभागृहात मनपा शाळांतील रिक्त जागांवर मानधन तत्वावर शिक्षकांची नेमणूक करण्याचा ठराव पारीत करण्यात आला.
मानयनिंग कामात नियम डावलल्याचा आरोप
डम्पिंग ग्राउंडवरील बॉयो मायनिंगच्या कामात नियम डावलण्यात आल्याचा आरोप नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केला. मात्र महापौर राखी कंचर्लावार यांनी हा आरोप फेटाळून लावला. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून तपासणी करून अन्नधान्याचे किट्स वाटण्यात आले. त्यामुळे या आरोपातही तथ्य नसून विकासात अडचणी आणत असल्याचे महापौर राखी कंचर्लावार म्हणाल्या.