ताडोबातील सहा वाघ गुजरात व नागझिऱ्यात पाठविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2023 08:10 AM2023-04-26T08:10:00+5:302023-04-26T08:10:02+5:30
Chandrapur News ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढल्याने काही वाघांचे अन्य व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरण करण्याच्या हालचाली वनविभागाने सुरू केल्या आहेत. यातील सुमारे सहा वाघ गुजरात व नागझिरा प्रकल्पात पाठविण्यात येणार आहेत.
राजकुमार चुनारकर
चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढल्याने काही वाघांचे अन्य व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरण करण्याच्या हालचाली वनविभागाने सुरू केल्या आहेत. यातील सुमारे सहा वाघ गुजरात व नागझिरा प्रकल्पात पाठविण्यात येणार असून, त्यादृष्टीने झरणी वाघिणीच्या पोक्त झालेल्या मादी बछड्याला खडसंगी बफर झोन क्षेत्रातील नवेगाव परिसरात जेरबंद करण्याची माेहीम हाती घेतल्याची माहिती सूत्राने दिली.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प वाघांच्या प्रजननासाठी उत्तम असल्याने मागील काही वर्षांपासून वाघांची संख्या वाढतच आहे. वाढत्या वाघांच्या संख्येने ताडोबातील जंगल कमी पडू लागले आहे. त्यामुळे मानव वन्यजीव संघर्ष वाढत आहे यावर उपाय म्हणून वनविभाग येथील वाघांचे स्थलांतर इतर क्षेत्रात करीत आहे. ब्रह्मपुरी विभागातून सहा वाघांचे स्थलांतरण नागझिरा व गुजरात येथे करण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यादृष्टीने खडसंगी बफरझोन क्षेत्रातील नवेगाव गेट व भुयार देव परिसरात पर्यटकांची आवडती असलेल्या झरणी वाघिणीच्या बछड्याला जेरबंद करण्याची मोहीम वनविभागाने सुरू केली आहे. मात्र, ताडोबा व्यवस्थापनाने याबाबत कमालीची गुप्तता पाळली आहे.