सहा वर्षांपासून कोठारीतील पाणीपुरवठा ठप्प
By admin | Published: March 9, 2017 12:50 AM2017-03-09T00:50:04+5:302017-03-09T00:50:04+5:30
मागील सहा वर्षांपासून कोठारीतील नळयोजना तांत्रिक बिघाडामुळे तसेच थकीत वीज देयकामुळे बंद पडली आहे.
हातपंपावर १५ हजार नागरिकांचा पाण्यासाठी संघर्ष : उन्हाळ्यात पाणीटंचाई तीव्र होणार, ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
सुरेश रंगारी कोठारी
मागील सहा वर्षांपासून कोठारीतील नळयोजना तांत्रिक बिघाडामुळे तसेच थकीत वीज देयकामुळे बंद पडली आहे. त्यामुळे १५ हजार लोकसंख्या असलेल्या कोठारीकरांना ६० हातपंपांवर पाण्याची तहान भागवावी लागत आहे. मात्र ग्रामपंचायतीने ठप्प पाणीपुरवठा सुरळीत करण्याकरिता कोणतीही उपाययोजना केली नसल्याने गावकऱ्यांना सहा वर्षांपासून पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
सहा वर्षांपूर्वी नळयोजनेच्या विहिरीत मोटारपंप पडला होता व ग्रामपंचायती समोरील विंधन विहिरीतील तसेच बाजारातील विंधन विहिरीत मोटारपंप पडले होते. ते मोटारपंप बाहेर काढून त्यांची दुरूस्ती करण्यात आली व पुन्हा मोटारपंप बसविण्यात आले. मात्र त्यानंतर वीज वितरण कंपनीने नळयोजनेचा ७ लक्ष रूपयाच्या थकीत देयकासाठी वीज पुरवठा खंडीत केला. तेव्हापासून नळयोजनेचा पुरवठा ठप्प असून तो आजपर्यंत सुरू करण्यात आलेला नाही. सध्या कार्यरत ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत नाही. गावकऱ्यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी अनेकदा निवेदने, महिलांचे मोर्चे काढले. मात्र त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. प्रत्येक उन्हाळ्यात गावात पाणीटंचाई निर्माण होत असते. त्यावेळी गावकरी पाण्यासाठी ग्रामपंचायतीसमोर आग्रह धरत होते. अखेर निर्जीव पदाधिकाऱ्यांना व प्रशासनाला जाग आली नाही व पाणीटंचाई तीव्र होत गेली.
वीज वितरण कंपनीकडे
सात लाखांचा कर थकीत
कोठारी ग्रा.पं. च्या हद्दीत वीज वितरण कंपनीचे ३३ के.व्ही. उपकेंद्र आहे. त्यात कार्यरत कर्मचाऱ्यांची निवासासाठी वसाहत आहे. सन २००८ पासून वीज कंपनीने ग्रा.पं. कडे कराचा भरणा केलेला नाही. ग्रा.पं. ने अनेकदा नोटीस बजावून थकीत कराचा भरणा भरण्यासाठी आग्रह केला. मात्र आजपर्यंत कर भरलेला नाही. उलट कोठारीतील नळयोजनेच्या थकीत वीज देयकासाठी वीज पुरवठा खंडीत केला. वीज वितरण कंपनीकडे ७ लाख ७३ हजार ५६६ रुपये व त्यावरील व्याज थकीत आहे. कंपनीच्या थकीत देयकासाठी अधिकारी कारवाई करतात. मात्र ग्रा.पं.चे थकीत कर वीज कंपनी भरणा करीत नाही. कंपनीच्या हेकेखोर वृत्तीने गावकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा
नवीन नळयोजनेचे पाणी वर्षभरानंतर
राज्याच्या खनिज विकास निधी अंतर्गत कोठारीत साडेतीन करोड रुपयांची नवीन नळयोजना मंजुर करण्यात आली. काटवली नजीक वर्धा नदीवर नळयोजनेचे काम जवळपास पूर्ण होत आलेले आहे. वर्धा नदीचे पाणी फिल्टर करून गावात पुरवठा केला जाणार आहेत. या योजनेचे काम दोन महिन्यात पूर्ण होणार आहे. मात्र गावकऱ्यांना त्याचे पाणी वर्षभर तरी मिळणार नाही. जोपर्यंत जुन्या नळयोजनेचे वीज वितरण कंपनीचे थकीत वीज देयक भरणा करणार नाही, तोपर्यंत नवीन नळयोजनेला वीज पुरवठा केल्या जाणार नाही. त्यामुळे ग्रा.पं. व वीज वितरण कंपनीच्या थकीत देयकाच्या संघर्षात कोठारीकरांचा जीव टांगणीला लागला आहे.
ग्रामपंचायतीचे कर वीज कंपनीकडे थकीत असून त्यासाठी अनेकदा नोटीसा बजावल्या. परंतु, थकीत कराचा भरणा करण्यात आला नाही. पुढील मासीक सभेत वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा व थकीत कर वसुल करण्याचा ठराव करून कारवाई करण्यात येणार आहे.
- एल. एन. वासाडे, ग्रामविकास अधिकारी, कोठारी.