स्केटींगच्या चिमुकल्या बादशहाची आईला अनोखी श्रद्धांजली, तिच्या तेरवीलाच मिळवला खिताब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 06:11 PM2017-08-21T18:11:31+5:302017-08-21T18:13:52+5:30
तेरवीच्या दिवशी पुणे येथे आयोजित वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया या मॉस खिताबचा भागीदार बनून आपल्या आईला अनोखी श्रद्धांजली अर्पण केली.
राजेश भोजेकर
चंद्रपूर : सुख जवाएवढे आणि दु:ख पर्वताएवढे ही म्हण येथील साडेसहा वर्षीय स्केटींगच्या बादशहाने खोटी ठरवली. बालपणीच स्केटींगमध्ये विविध विक्रमांची नोंद आपल्या नावे करणाऱ्या शिशिर उर्फ धृव सुभाष कामडी या चिमुकल्याने आपल्या आईच्या निधनाचे दु:ख बाजुला ठेवून तिच्या तेरवीच्या दिवशी पुणे येथे आयोजित वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया या मॉस खिताबचा भागीदार बनून आपल्या आईला अनोखी श्रद्धांजली अर्पण केली.
हा खिताब पटकावल्यापासून त्याला आपल्या आईची आठवण आणखी प्रकर्षाने जाणवू लागली आहे. तो सोमवारी चंद्रपुरात परतला तेव्हा आता आपली आई नेहमीसारखे कौतुक करायला नाही. ही गोष्टच त्याच्या मनाला न पटणारी झाली आहे.
धृवच्या नावावर लिंबो स्केटींगमध्ये गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड, गोल्डन बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड व इंडियन अॅचिव्हर बुक आॅफ रेकॉर्ड, स्पिड स्केटींगमध्ये आशिया बुक आॅफ रेकॉर्ड व इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड या नोंदी आहे. १५ आॅगस्ट २०१५ रोजी सेवाग्राम ते वर्धा स्वराज यात्रा स्केटींग रॅलीमध्ये सहभाग नोंदविला. २६ जानेवारी २०१७ रोजी उमरेड जि. नागपूर येथे सलग सात तास स्केटींग केली. तसेच स्केटींगच्या विविध स्पर्धांमध्ये भाग घेत आतापर्यंत त्याने २० गोल्ड, सहा रजत आणि दोन ब्रॉस पदक पटकावले आहे.
स्कॅटेलान अॅन्ड वेवबोर्ड स्पोर्टस् महाराष्ट्र असोसिएशनच्यावतीने पुणे येथील महाराष्ट्र मंडळ स्पोर्टस अॅन्ड एज्युकेशन कॉम्प्लेक्स येथे स्टुडंट परफार्मस रोलर स्केटींग इन कपल अंतर्गत वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाचे पहिल्यांदाच आयोजन २० आॅगस्ट रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये धृवने सहभागी व्हावे, यासाठी त्याची आई शिल्पा हिने ३० जुलै रोजी त्याचा सहभागी फार्म भरून दिला. मात्र नियतीला काही वेगळेच हवे होते. या स्पर्धेची तयारी सुरू होती. स्पर्धा जवळ आली असताना ८ आॅगस्ट रोजी धृवची आई शिल्पा हिने अचानक जगाचा निरोप घेतला. आईच्या एकाएकी निघून जाण्याने धृव पूरता खचला. मात्र या स्पर्धेसाठी खुद्द आईनेच आग्रह धरला असल्याची आठवण त्याला झाली. हीच आईला खरी श्रद्धांजली ठरेल. २० आॅगस्ट रोजी ही स्पर्धा होती आणि त्याचदिवशी त्याच्या आईची तेरवीसुद्धा होती. या स्केटींगच्या चिमुकल्या बादशहाने दु:ख बाजुला सारून या स्पर्धेत सहभाग नोंदविला. आणि या अनोख्या विक्रामाचा तो भागीदार ठरला. ही भागीदारी आपल्या आईला खरी श्रद्धांजली असल्याचे धृवने ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले. मी मोठे व्हावे, ही आईची इच्छा होती. तिच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचा संकल्प केला असल्याचे सांगताना त्याच्या डोळ्यात अश्रू तरंगत होते.