शक्तिशाली ब्लास्टिंगने स्लॅबचे सिलिंग कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 12:20 AM2018-04-27T00:20:03+5:302018-04-27T00:20:03+5:30
राजुरा तालुक्यातील गोवरी येथे शक्तीशाली ब्लास्टिंगने बंडू भुसे यांच्या घराच्या स्लॅबची सिलिंग अचानक कोसळली. सुदैवाने या घटनेत भुसे कुटुंबीय बचावले. यात मोठा अनर्थ टळला. ही घटना गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : राजुरा तालुक्यातील गोवरी येथे शक्तीशाली ब्लास्टिंगने बंडू भुसे यांच्या घराच्या स्लॅबची सिलिंग अचानक कोसळली. सुदैवाने या घटनेत भुसे कुटुंबीय बचावले. यात मोठा अनर्थ टळला. ही घटना गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.
राजुरा तालुक्यातील गोवरी येथील बंडू भुसे यांच्या राहत्या घराची स्लॅबची सिलिंग गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास अचानक कोसळली. दुपारी रखरखते उन्ह असल्याने भुसे यांचे कुटुंबीय घरीच होते. मात्र अचानक वेकोलितील शक्तीशाली ब्लास्टिंगचा हादरा बसला. या शक्तीशाली स्फोटाने बंडू भुसे यांच्या राहत्या घरातील स्लॅबचे सिलिंग अचानक कोसळले. यात प्लास्टिकची एक खूर्ची पूर्णत: तुटली आहे. ज्या ठिकाणी स्लॅबची सिलिंग कोसळली, त्या ठिकाणी भुसे कुटुंबातील सदस्य काही वेळासाठी दुपारी आराम करीत होते. मात्र ते पाच मिनिटापूर्वीच तिथून उठून गेल्याने मोठा अनर्थ टळला. घटना घडली तेव्हा भुसे यांचा मुलगा तिथेच बाजूला बसून होता.
मात्र नशिब बलवत्तर म्हणून सुदैवाने त्याला कुठलीच दुखापत झाली नाही. गोवरी गाव वेकोलिच्या कोळसा खाणीला लागून आहे. वेकोलित कोळसा उत्खननासाठी वेळी-अवेळी शक्तीशाली ब्लास्टिंग करुन स्फोट घडवून आणतात. त्यामुळे बहुतांश घरांना तडे गेले आहे तर ब्लास्टिंगमुळे घर कोसळल्याच्या घटना यापूर्वी गोवरी येथे घडल्या आहेत. गावकऱ्यांनी वेकोलिला अनेकदा निवेदन देऊन ब्लास्टिंगची तिव्रता कमी करण्याचे सांगितले होते. मात्र वेकोलि प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आजची घटना घडली. सुदैवाने या घटनेत अख्खे कुटुंबीय बचावले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
काळ आला; पण वेळ आली नव्हती
गोवरी येथील बंडू भुसे यांच्या घराच्या स्लॅबची सिलिंग कोसळली, तेव्हा कुटुंबीय दुपारी १ वाजताच्या सुमारास घरीच होते. मात्र काही वेळापूर्वी ते तिथून उठून गेल्यामुळे सुदैवाने सर्व बचावले.
गोवरी येथे अनेक घरांना तडे
गोवरी गावाला वेकोलिची खदान अगदी लागून आहे. वेकोलित वेळीअवेळी करण्यात येणाऱ्या ब्लास्टींगने अनेक घरांना तडे गेले आहे. त्यामुळे यासारखी शक्तीशाली ब्लास्टिंग होऊन एखादवेळी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.