वनविभागाच्या आंधळेपणाने ७२ सागवान झाडांची कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2017 12:46 AM2017-03-11T00:46:11+5:302017-03-11T00:46:11+5:30
स्वत:च्या शेतातील धुऱ्यावरचे सागाचे एक झाड तोडायचे असले तरी शेतकऱ्यांना वनविभागाचे उंबरठे झिजवावे लागतात.
रेकॉर्डवर २५ झाडे : तरीही ७२ झाडांच्या कत्तलीची परवानगी दिली कशी ?
चंद्रपूर : स्वत:च्या शेतातील धुऱ्यावरचे सागाचे एक झाड तोडायचे असले तरी शेतकऱ्यांना वनविभागाचे उंबरठे झिजवावे लागतात. वर्ष निघून जावूनही परवानगी मिळत नाही. कुणी स्वत:हून झाड तोडलेच तर वन अधिनियमानुसार तो गुन्हा ठरतो. असे असताना चिमूर तालुक्यातील चिचघाट येथील शेतशिवारातून चक्क ७२ सागाची झाडे वन अधिकाऱ्यांच्या परवानगीनेच तोडण्याचा प्रकार घडला आहे. विशेष म्हणज, शेतात केवळ २५ झाडे असताना कागदावर ७२ झाडे दाखवून लगतच्या शेतातील झाडे तोडण्यात आल्याने हे प्रकरण गंभीर ठरले आहे.
या संदर्भात सिद्धार्थ शंकर ढेकले या शेतकऱ्याने वनाधिकाऱ्यांकडे तक्रार केली असली तरी अद्याप कसलीही दखल घेण्यात आलेली नाही. यामुळे हा कसला कायदा, असा प्रश्न या व्यथीत शेतकऱ्याने उपस्थित केला आहे.
चिचघाट यीथील शेतशिवारात सर्व्हे क्रमांक २५ मध्ये सिद्धार्थ ढेकले यांची १.४८ हेक्टर शेतजमीन आहेत. त्यांच्या शेतात ५० ते ६० वर्षे जुनी सागाची झाडे असल्याची नोंद खातेपुस्तिकेवर आणि सात-बारावर आहे. सुमारे ४.५ घनमिटर लाकूड असलेल्या या झाडांची किंमत बाजारभावानुसार दीड ते पाऊणेदोन लाख रूपये आहे. त्यांच्या शेतातलगतच टुमदेव श्रीहरी बारेकर यांचे सर्व्हे क्रमांक २६ हे शेत आहे. त्यांच्या शेतात असलेली झाडे तोडण्यासाठी त्यांनी वनविभागाकडे परवानगी मागीतली होते. मात्र योग्य सिमांकन न करता सिद्धार्थ ढेकले यांचया शेतातील झाडांसह लगतच्या शेतातील अशी ७२ झाडे १२ ते १३ जानेवारीला तोडण्यात आली. या दरम्यान सिद्धार्थ ढेकले बाहेरगावी होते. दोन दिवसांनी गावात परतले असता आपल्या शेतातील झाडे तोडून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावर त्यांनी वनपरिक्षेत्राधिकारी चिवंडे यांच्याकडे विचारणा केली असता वनविभागाच्या परवानगीने झाडे कापली असे सांगण्यात आले. आपण परवानगी मागितली नसतानाही झाडे का तोडली, यावर मात्र ते समाधान करू शकले नाही. आपणास न्याय मिळावा यासाठी सिद्धार्थ ढेकले यांनी चिमूर एसडीओंकडे तक्रार केली. त्यांनी शेगावच्या ठाणेदारांना चौकशीचे आदेश दिले. या चौकशीतही अतिरिक्त झाडे कापल्याचे निदर्शनास आले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
विनापरवानगीने झाडे तोडली, त्याचे काय ? -ढेकले
आपले शेत बोरकर यांच्या शेतालगत आहे. त्यांच्या शेतातील झाडे तोडण्यावर आपला आक्षेप नाही. मात्र आपल्या शेतातील झाडे तोडण्याबाबत आपण अर्ज केला नसतानाही ती गुपचूप तोडण्यात आली. त्या झाडांची सात-बारावर नोंद आहे. ही झाडे तोडून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपले प्रचंड नुकसान केले आहे, त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न सिद्धार्थ ढेकले यांनी उपस्थित केला आहे. चुकीचे सिमांकन करून परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
आक्षेप नसल्याने
परवानगी दिली-चिवंडे
या संदर्भात वनपरिक्षेत्राधिकारी चिवंडे यांच्याशी संपर्क साधला असता, टुमदेव बोरकर यांना झाडे तोडण्याची परवानगी देण्यापूर्वी आपण जाहिरनामा काढला होता. सिद्धार्थ ढेकले यांचे शेत लागूनच आहे. त्यांचा आक्षेप नव्हता. त्यामुळे कुणाचाही आक्षेप नसल्याने परवानगी दिली, असे मोघम उत्तर वनपरिक्षेत्राधिकारी चिवंडे यांनी दिले आहे. अद्याप लाकडे रवाना झालेली नाहीत. ढेकले यांना त्यांच्या मालकीची लाकडे देता येतील, अशीही सावरासावर त्यांनी केली.