विदर्भात विना परवानगी लाखोंच्या सागवानाची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 11:22 AM2018-03-20T11:22:26+5:302018-03-20T11:22:38+5:30

शेतकऱ्याकडून विकत घेतलेली सागवान झाडे कंत्राटदाराने कुठलीही परवानगी न घेता परस्पर तोडल्याचा प्रकार चंद्रपूर-वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील वरोरा तालुक्यातील वाढोडा, कोसरसार शिवारात उघडकीस आला आहे.

Slaughter of millions of Teak wood without permission in Vidarbha | विदर्भात विना परवानगी लाखोंच्या सागवानाची कत्तल

विदर्भात विना परवानगी लाखोंच्या सागवानाची कत्तल

googlenewsNext
ठळक मुद्देकंत्राटदाराचा प्रतापचंद्रपूर-वर्धा जिल्हा सीमेवरील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क 
चंद्रपूर : शेतकऱ्याकडून विकत घेतलेली सागवान झाडे कंत्राटदाराने कुठलीही परवानगी न घेता परस्पर तोडल्याचा प्रकार चंद्रपूर-वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील वरोरा तालुक्यातील वाढोडा, कोसरसार शिवारात उघडकीस आला आहे. यात लाखोंच्या तब्बल ७५ सागवृक्षांची कत्तल करण्यात आली आहे.
चंद्रपूर-वर्धा जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या वाढोडा शिवारातील एका शेतात मोठ्या प्रमाणात साग वृक्ष लावण्यात आले. शेताच्या दोन्ही बाजूला तास नाला आहे. साग वृक्ष मोठे झाल्यानंतर शेतकऱ्यांने त्या वृक्षांची नोंद सातबारावर घेणे आवश्यक होते. मात्र शेतकऱ्यांने तसे न केल्याने याचाच फायदा घेत कंत्राटदाराने लाखो रुपये किंमतीचे ७५ सागवृक्ष कापून टाकले. मालकीचे सागवृक्ष असले तरी ते तोडण्यापूर्वी करारनामा, अधिकार अभिलेख पंजी, सातबारा, वृक्ष तोडण्यापूर्वी व तोडल्यानंतर स्थिती दर्शविणारा नकाशा, चतु:सीमा प्रमाणपत्र, आजुबाजुच्या शेतकऱ्यांचे ना हरकत प्रमाणपत्र, परवानगी प्राप्त झाडां व्यतिरिक्त झाडे तोडणार नसल्याबाबतचे शेतमालकाचे प्रमाणपत्र, एकापेक्षा अधिक नावे असल्यास संमतीपत्र, एकत्रीकरण नकाशा, मोजणी क शिट, भोगवटदार वर्ग दोन असल्यास तहसीलदाराचे प्रमाणपत्र, नाला व नदी काठापासून ३० मीटर आत झाडे असल्यास जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी, ग्रामपंचायतीचे जाहीर प्रकटीकरण असे महत्त्वपूर्ण दस्तऐवज लागतात.
मात्र ७५ वृक्षांची कत्तल करताना वृक्ष विकत घेणाऱ्याने कुठलेही दस्तऐवज सादर केले नाही.ज्या ठिकाणी सागवान वृक्ष तोडले, तो परिसर जंगलव्याप्त आहे. जंगलातही सागवान वृक्ष असल्याने तेदेखील तोडले गेले असावे, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

जेसीबीने जमिनीचे सपाटीकरण
अवैधरित्या सागवान झाडे तोडल्याची चर्चा सुरू झाल्याने झाडे तोडणाऱ्याने शक्कल लढवून जमिनीतील बूड उपटून त्याची विल्हेवाट लावली. त्यानंतर जेसीबी लावून जमिनीचे सपाटीकरण सुरू केले आहे.

अधिकाऱ्यांची सावध भूमिका
प्रकरण आपल्यावर शेकणार या भितीने वनधिकारी व कर्मचाऱ्यांनी सावध भूमिका घेत काही नोंदी आधीच करून आपला अहवाल सादर केल्याची माहिती आहे. यावर वनधिकारी व कर्मचारी गप्प आहेत.

कंत्राटदार ते कर्मचारी
वनविभागात कंत्राटदार म्हणून कार्यरत एका व्यक्तीची वनविभागाच्या संबंधीत कक्षात कर्मचारी म्हणून नियुक्ती झाली. हाच कर्मचारी दुसऱ्याच्या नावे वृक्ष तोडण्याचे कंत्राट घेत असल्याचे समजते. सदर कर्मचारी पूर्वी कंत्राटदार असल्याने त्याचा वनविभागात चांगलाच बोलबाला आहे.

या प्रकरणाची माहिती कानावर आली आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनात प्रकरणाची योग्य चौकशी करू.
- व्ही. यू. उराडे, वनपरिमंडळ अधिकारी, टेमुर्डा.

Web Title: Slaughter of millions of Teak wood without permission in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.