चंद्रपुरात वाहतूक कोंडीविरोधात जटपुरा गेटवर झोपा काढा आंदोलन
By साईनाथ कुचनकार | Published: December 11, 2023 03:22 PM2023-12-11T15:22:07+5:302023-12-11T15:26:33+5:30
इको-प्रो : वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी उचलले पाऊल
चंद्रपूर : शहरात वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. जटपुरा गेट परिसरात तर वाहतुकीच्या कोंडीमुळे वाहनधारक, पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. येथील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, या मागणीला घेऊन सोमवारी इको-प्रोच्या सदस्यांनी जटपुरा गेट परिसरात ‘झोपा काढा सत्याग्रह’ करत शासन-प्रशासन व जनप्रतिनिधींचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. त्या तुलनेत रस्ते अरुंद आहेत. विशेष म्हणजे, जटपुरा गेट परिसरात वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली आहे. यात वाहनधारकांना प्रदूषणाचाही मारा सहन करावा लागत आहे. यामुळे अनेकांना आजार होत आहे. या कोंडीमुळे अनेकवेळा रुग्णवाहिकाही अडकत असल्याने रुग्णाचा जीव धोक्यात येत आहे. अधिक काळ वाहनांच्या गर्दीमुळे निघणाऱ्या धुरामुळे वाहनधारकांचा जीव गुदमरतो. त्यामुळे येथील समस्या कायमस्वरूपी सोडवावी, अशी मागणी करत इको- प्रोच्या सदस्यांनी सोमवारी ‘झोपा काढा’ आंदोलन करत प्रशासन तथा शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
इको-प्रोतर्फे अध्यक्ष बंडू धोतरे यांच्या नेतृत्वात सदर सत्याग्रह करण्यात आला. या झोपा काढा आंदोलनामध्ये नितीन रामटेके, अब्दुल जावेद, ओमजी, वर्मा, अनिल अडगुरवार, कुणाल देवगिरकर, राजू काहिलकर, स्वप्नील मेश्राम, सचिन धोतरे, आकाश घोडमारे, सुरज कावळे, भूषण ढवळे, खुशबू जैस्वाल, नेत्रदीपा चिंचोलकर, रोहित तळवेकर आदी उपस्थित होते.
तीव्र आंदोलनाचा इशारा
जटपुरा गेटवर इको-प्रोच्या सदस्यांनी यापूर्वीसुद्धा विविध आंदोलने केली असून, अनेकदा पाठपुरावा केला आहे. यासोबतच अनेक संस्था, संघटना यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. अनेक वर्षांपासून जटपुरा गेटची वाहतूक समस्या सोडविण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी होत आहे. परंतु, आजपर्यंत यात कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. हिवाळी अधिवेशनानिमित्त इको-प्रोतर्फे सुरू असलेल्या एक दिवस एक आंदोलन श्रुंखलेमध्ये सोमवारी तिसऱ्या दिवशी केलेल्या प्रतिकात्मक ‘झोपा काढा सत्याग्रह’निमित्ताने येत्या काळात या मागणीकरिता तीव्र आंदोलन करण्याचा इशारासुद्धा इको-प्रोतर्फे देण्यात आला आहे.