स्लीपर कोच ट्रॅव्हल्सचा अपघात, सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप
By राजेश भोजेकर | Published: July 15, 2023 12:59 PM2023-07-15T12:59:00+5:302023-07-15T13:01:56+5:30
जवळच असलेल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना या अपघाताची माहिती मिळताच गाडीतील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदत केली.
मूल (चंद्रपूर) : मूल-चंद्रपूर मार्गावरील एम.आय.डी.सी.परीसरात स्लीपर कोच ट्रॅव्हल्सला अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला आहे. १५ जुलै रोजी मध्यरात्री रात्री १२ वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे पोलिसांनी सांगितले.
रायपूरवरुन हैदराबादला जवळपास ४५ मजुर प्रवासी घेऊन भरधाव जाणारी स्लीपर कोच टायगर कंपनीची ट्रॅव्हल्स चालकाचे नियंत्रण सुटले. गडचिरोली-चंद्रपूर महामार्गावर मूल नजीक एमआयडीसी टी पाँईटजवळ ती भरधाव असल्याने रस्त्याच्या कडेला शेतात जाऊन पलटली. जवळच असलेल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना या अपघाताची माहिती मिळताच गाडीतील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदत केली.
मूल पोलिस स्टेशनला माहिती देण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस ताबडतोब घटना स्थळावर दाखल झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. वेळीच मदत मिळाल्याने या अपघातात सुदैवाने जिवितहानी झाली नाही. या ट्रॅव्हल्सचा चालक इसराइल खान (४०) रा. शिवनी मध्यप्रदेश याचेवर कलम २७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. यात कुणीही गंभीर जखमी नसल्याचे पोलिस निरीक्षक सुमित परतेकी यांनी लोकमतला सांगितले.