झोपडपट्टीवासीय जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले

By admin | Published: May 5, 2017 12:57 AM2017-05-05T00:57:09+5:302017-05-05T00:57:09+5:30

४० वर्षांपासून दुर्गापूर परिसरात वास्तव्य करीत असलेल्या नागरिकांच्या झोपडपट्टया पाडून त्यांना बेघर करण्यात आले.

The slum dwellers went to the Collector's office | झोपडपट्टीवासीय जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले

झोपडपट्टीवासीय जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले

Next

काँग्रेसचे नेतृत्व : झोपडपट्ट्या उद्ध्वस्त करणाऱ्यांवर कारवाई करा
चंद्रपूर : ४० वर्षांपासून दुर्गापूर परिसरात वास्तव्य करीत असलेल्या नागरिकांच्या झोपडपट्टया पाडून त्यांना बेघर करण्यात आले. हा प्रकार अन्यायकारक असून दोषींवर तत्काळ कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज गुरुवारी शेकडो झोपडपट्टीवासीय जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.
काँग्रेसचे माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात झोपडपट्टीवासीयांचा हा मोर्चा काढण्यात आला. सकाळी ११ वाजता दुर्गापूर परिसरातील अन्यायग्रस्त शेकडो झोपडपट्टीवासीय गांधी चौकात जमा झाले. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्तेही उपस्थित होते. त्यानंतर नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात गांधी चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. शहरातील महात्मा गांधी मार्गाने फिरत हा मोर्चा प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. यावेळी संबंधित सरपंच सत्यवान बेंडले व दोषींवर कारवाई करा, गरिबांवरील अन्याय दूर करा, अशा घोषणा देण्यात येत होत्या. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचल्यानंतर तिथे छोटेखानी सभा घेऊन मोर्चेकरांना संबोधित करण्यात आले. त्यानंतर शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फतीने निवेदन देण्यात आले.

राजकीय दबावात हटविल्या १३५ झोपड्या-पुगलिया
चंद्रपूर : दुर्गापूर झोपडपट्टीवर वेकोलिच्या जागेवरील ४६ झोपड्या हटविण्याचा उच्च न्यायालयाचा २०१६ चा आदेश असताना २५ व २७ एप्रिलला तब्बल १३५ जणांच्या झोपड्या हटवून त्यांना एकाएकी बेघर करण्यात आले. ही कार्यवाही राजकीय दबावात करण्यात आल्याचा आरोप करुन याबाबत सत्यवान बेंडले व संबंधितांवर कार्यवाही करण्याची मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. यावेळी बोलताना पुगलिया म्हणाले, सदर झोपड्या हटविताना कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या नावावर केवळ ७० पोलिसांचेच २ लाख १० हजार रुपये जमा करण्यात आले. वास्तविक, त्यावेळी तब्बल ३०० वर पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला होता. सदर झोपड्या हटविण्याच्या कार्यवाहीने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते, याकडेही नरेश पुगलिया यांनी यावेळी लक्ष वेधले. झोपडपट्टी हटविलेल्या जागेला आजघडीला १२०० ते १५०० रुपये चौरस फुटाचा भाव सुरू आहे. या जागेचा सौदा झाल्याची माहिती आहे. याच कारणाने ही कार्यवाही अतिशय क्रूरतापूर्वक केल्याचा आरोपही नरेश पुगलिया यांनी केला. दुर्गापूरच्या २७ एकर जागेवर मागील ४० वर्षांपासून सुमारे १५०० झोपड्या असून गरीब कामगार राहतात. ही जागा राज्य सरकारने ५-५ एकर वाटपामध्ये स्वातंत्र्यापूर्वी दिलेली आहे. मध्यंतरी सरपंच बेंडले यांनी या जागेवर आपला दावा सांगितला. अशातच न्यायालयात झोपडपट्टीवासीयांच्या विरोधात अनेक केसेस टाकण्यात आल्या. अंदाजे ३० वर्षे न्यायालयीन प्रकरणात गुंतवून ठेवण्यात आले. यामध्ये झोपडपट्टीधारक गरीब असल्यामुळे तारखेवर जाणे व वकिलांना पैसे देणे त्यांच्या आवाक्याबाहेर गेले. याचा फायदा घेत बेंडले परिवार यशस्वी झाला, अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार २७ एकरापैकी साडेचार एकरावरील अंदाजे १३५ झोपड्या बुलडोझरच्या सहाय्याने शेकडो पोलिसांच्या बंदोबस्तात पाडण्यात आल्या. केवळ ४६ झोपड्याच हटविण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश होते, ही बाबही यावेळी नरेश पुगलिया यांनी नमुद केली. पत्रकार परिषदेला जिल्हा शहर काँग्रेसचे नंदू नागरकर, अ‍ॅड. अविनाश ठावरी, गजानन गावंडे, अशोक नागापुरे, प्रविण पडवेकर, अनु दहेगावकर आदी उपस्थित होते.(जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: The slum dwellers went to the Collector's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.