अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा झाला कृषी वैज्ञानिक; खडतर परिस्थितीवर मात करत घातली यशाला गवसणी
By परिमल डोहणे | Published: January 16, 2023 11:53 AM2023-01-16T11:53:01+5:302023-01-16T11:58:03+5:30
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून घेतले धडे
चंद्रपूर : घरी अठराविश्व दारिद्र्य. वडिलांकडे केवळ दोन एकर शेती. त्यातच सहा जणांचा गाडा कसाबसा चालायचा. परंतु, मनात अधिकारी बनण्याचे स्वप्न होते. त्यासाठी कठोर परिश्रम घेतले. अन् शेवटी यशाला गवसणी घालत जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणारा पोरगा चक्क कृषी वैज्ञानिक झाला. ही यशोगाथा आहे, दाबगाव मक्ता येथील डॉ. आकाश रवींद्र चिचघरे याची. नुकताच एएसआरबीचा निकालात आकाश हा भारतातून ओबीसीमधून प्रथम आला आहे. तो आता कृषी वैज्ञानिक म्हणून रुजू होणार आहे.
आकाशचे वडील शेतकरी. पण दोन एकर शेतीवर कुटुंबाचा गाडा चालत नाही म्हणून ते गवंडी काम करतात. त्यांना दोन मुले. मोठा मुलगा आकाशला शिक्षणाची मोठी आवड. त्यामुळे वडिलांनीही त्याला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. आकाशचे प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद शाळा दाबगाव येथे झाले. त्यानंतर त्याचा जवाहर नवोदय विद्यालय तळोधी (बा) नंबर लागला. बारावीपर्यंतच त्याचे शिक्षण तिथेच झाले. त्यानंतर अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे बीएसी वनविद्याचे शिक्षण घेतले. एमएससी (कृषी वाणिकी) बनारस हिंदू विश्व विद्यालय, वाराणशी येथे पूर्ण केले. त्यानंतर केरला ॲग्रीकल्चर युनीव्हसीटी
येथे ‘वनस्पती चारा’ या विषयावर पीएचडी सुरु केली. दरम्यान त्याने दोन महिने वन उत्पादकता संस्थान रांची येथे टेक्निकल ऑफिसर म्हणून काम केली. यावेळी त्याची स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु होती. सन २०२१ मध्ये अग्रीकल्चर सायटिक रिक्यूटमेंट बोर्ड (एएसआरबी) ने घेतलेल्या परीक्षेत तो ओबीसी गटातून जिल्ह्यातून प्रथम आला आहे.
शिष्यवृत्तीतून शिक्षणाला आधार
आकाशची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. वडील जसे जमेल तसे त्याला मदत करत होते. परंतु, मोठ्या शहरात शिक्षणासाठी खर्च अधिक लागत असल्याने त्याला आर्थिक अडचण भासायची. दरम्यान त्याने सन २०१८ मध्ये आयसीएआरएसआरएफची शिष्यवृत्ती मिळाली. त्यानंतर सन २०१९ मध्ये युजीसी जेआरएफची शिष्यवृत्ती पटकावली. या भरोशावरच त्याचे शिक्षण पूर्ण झाले.
२०२१ मध्ये दिली परीक्षा
पीएचडीचे संशोधन सुरू असतानाच आकाशची स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू होती. दरम्यान सन २०२१ मध्ये सन २०२१ मध्ये अग्रीकल्चर सायटिक रिक्यूटमेंट बोर्ड (एएसआरबी) ने कृषी वैज्ञानिक पदाची जाहिरात प्रसिद्ध केली. आकाशने तो अर्ज भरुन परीक्षेसाठी जीवतोड अभ्यास करू लागला. सन २०२१ मध्ये त्याची पूर्वपरीक्षा व २०२२ मध्ये त्याने मुख्य परीक्षा व मुलाखत झाली. दोन दिवसांपूर्वी लागलेल्या निकालात तो ओबीसीमधून भारतातून पहिला येत कृषी वैज्ञानिक झाला आहे.
कठोर परिश्रम गरजेचे
कोणतेही ध्येय गाठण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची गरज असते. जिद्द व मेहनतीवर आपण कोणत्याही परिस्थितीवर मात करत यशाला गवसणी घालू शकतो. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याने माझे व माझ्या कुटुंबीयांच्या कष्टाचे चीज झाले आहे.
- डॉ. आकाश रवींद्र चिचघरे