झोपडीत दरवळला यशाचा सुवास !
By admin | Published: June 18, 2014 12:08 AM2014-06-18T00:08:17+5:302014-06-18T00:08:17+5:30
यशाचा सुगंध लपत नसतो, हे पुन्हा चंद्रपुरातील वृषभच्या यशाने सिद्ध झाले आहे. बाबूपेठमधील झोपडपट्टीत केवळ एका खोलीच्या घरात राहणाऱ्या; घरी दारिद्रय असलेल्या वृषभ कालिदास तेलसे या प्रतिभावंताच्या यशाला
गोपालकृष्ण मांडवकर - चंद्रपूर
यशाचा सुगंध लपत नसतो, हे पुन्हा चंद्रपुरातील वृषभच्या यशाने सिद्ध झाले आहे. बाबूपेठमधील झोपडपट्टीत केवळ एका खोलीच्या घरात राहणाऱ्या; घरी दारिद्रय असलेल्या वृषभ कालिदास तेलसे या प्रतिभावंताच्या यशाला परिस्थिती रोखू शकली नाही, हेच यंदाच्या निकालातून स्पष्ट झाले आहे.
चंद्रपुरातील बाबूपेठ परिसरातील समता चौकालगतच्या एका गल्लीत तो राहतो. त्याचे वडील लोकांच्या कपड्यांना इस्त्री करून कुटुंब चालवितात. आई हाताला मिळेल ते काम करून कुटुंबाचा गाडा ओढते. वडील बीए तर, आई बारावीपर्यंत शिक्षण घेतलेली. वडिलाचे सातत्याने मार्गदर्शन असायचे. या वातावरणावरही वृषभने मात केली. त्याच्या यशाचे ‘लोकमत’पर्यंत पोहचले तेव्हा, त्याचे छायाचित्र घेण्यासाठी ही चमू घरी पोहचली. मात्र मुलाच्या यशाचे कौतूक करावे म्हणून पेढा भरविण्याएवढेही पैसेही या मातेजवळ नव्हते. घराचे छप्पर एवढे फाटलेले, की अवचित आलेल्या पावसाने घरभर पाणी पसरलेले ! परिस्थितीने या कुटुंबाच्या आनंदावर मात केली असली तरील, वृषभने मात्र अपार यश गाठून आपल्या यशाने या सर्व परिस्थितीवरच मात केली आहे.
या यशाबद्दल त्याला विचारले तेव्हा तो म्हणाला, तीन वर्षापूर्वी आपण मोबाईलवर व्हिडीओ क्लिप बघितली. ‘आपले स्वप्न मनात ठेवा, त्यावर सातत्याने विचार करा आणि मोठे व्हा’, असे त्या क्लिपमध्ये दाखविण्यात आले होते. तेव्हापासूनच आपण प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न उरात बाळगले. दहावीमध्ये किमान ९८ टक्के गुण मिळविण्याचा ध्यास घेतला. आपल्या घरच्या आरश्याजवळ मोठ्या अक्षरात ‘आपल्याला दहाव्या वर्गात १०० टक्के गुण घ्यायचे आहे’, अशी पट्टी चिपकवून ठेवली. अभ्यासातील सातत्य आणि शिक्षकांच्या परिश्रमामुळे आपल्याला ९७ टक्के गुण मिळाल्याचे त्याने सांगितले.
दरवर्षी दहावी-बारावीचे निकाल लागल्यानंतर अनेकांचे फोटो पेपरमध्ये येतात. आपलाही यावा असे मनात वाटत होते. रोज चार ते सहा तास अभ्यास आणि शिक्षकांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे आपण यश मिळवू शकल्याचे तो म्हणाला. आपण आयआयटी इंजिनिअरिंग करणार असून त्यानंतर युपीएससीची तयारी करून प्रशासकीय सेवेत जाऊन सामान्य नागरिकांची सेवा करणार असल्याचा त्याचा निर्धार आहे.