अन् त्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:26 AM2021-05-15T04:26:45+5:302021-05-15T04:26:45+5:30
चंद्रपूर : रोजगाराच्या शोधात त्यांनी चंद्रपूर गाठले. मात्र कोरोना आला. त्यामुळे लॉकडाऊन सुरू झाले. परिणामी, कोणतेही काम मिळेना, ना ...
चंद्रपूर : रोजगाराच्या शोधात त्यांनी चंद्रपूर गाठले. मात्र कोरोना आला. त्यामुळे लॉकडाऊन सुरू झाले. परिणामी, कोणतेही काम मिळेना, ना घराबाहेर पडता येईना. दोन वेळ जेवणाची भ्रांत कशी निभवावी, अशी समस्या उभी ठाकली. यातच राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या विभागीय अध्यक्ष ॲड. मेघा रामगुंडे यांच्या पुढाकाराने येथील गरजूंना अन्नधान्यांच्या किटचे वितरण करण्यात आले. राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या या उपक्रमाने त्या गरजूंच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. चंद्रपूर येथे परराज्यातील मजूर मोठ्या प्रमाणात कामाच्या शोधात येतात. परंतु, मागील वर्षी कोरोनामुळे कामगारांना अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे ते परत गेले. परंतु, सप्टेंबर-ऑक्टोबर २०२० मध्ये कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याने ते मजूर पुन्हा कामाच्या शोधात चंद्रपुरात दाखल झाले. १३ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून पुन्हा लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे या कामगारांवर उपासमारीची वेळ आली. याबाबतची माहिती राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या विभागीय अध्यक्ष ॲड. मेघा रामगुंडे यांना मिळताच त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह कामगारांची भेट घेत त्यांना तांदूळ, अन्नधान्य, कडधान्ये आदी जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले. या उपक्रमामुळे त्या गरजूंच्या चेहऱ्यावर हास्य उमलले.