उमेदवारांची सोशल मीडियावर धूम

By admin | Published: April 7, 2017 12:49 AM2017-04-07T00:49:43+5:302017-04-07T00:49:43+5:30

महानगरपालिका निवडणुकीचे पडघम आता जोरात वाजू लागले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारांनी आपापल्या मतदार प्रभागात प्रचारही सुरू केला आहे.

Smoke on the candidates' social media | उमेदवारांची सोशल मीडियावर धूम

उमेदवारांची सोशल मीडियावर धूम

Next

चंद्रपूर : महानगरपालिका निवडणुकीचे पडघम आता जोरात वाजू लागले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारांनी आपापल्या मतदार प्रभागात प्रचारही सुरू केला आहे. दिवसभर सूर्य आग ओकत असल्याने उमेदवार सकाळीच मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. दुपारी उगाच उन्हाचे चटके आणि मतदारांचे बोलणे ऐकावे लागू नये म्हणून अनेक उमेदवारांनी प्रचारासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे.
येत्या १९ एप्रिलला मनपा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. प्रचारासाठी उमेदवारांना केवळ आता बाराच दिवस मिळणार असल्याने त्यांची लगबग कमालीची वाढली आहे. मनपा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच अनेक राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधले होते. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख येऊन ठेपल्यानंतरच काँग्रेस, भाजप, राकाँ, शिवसेना या प्रमुख पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी घोषित केली. यात काही इच्छुकांना पक्षाच्या तिकिटा मिळाल्या तर काहींना यंदा ‘सबुरीने घेण्याचा’ सल्ला देण्यात आला. मात्र या तिकीट वाटपात नाराज झालेल्या काँग्रेसचे रामू तिवारी, भाजपाचे बलराम डोडानी यांनी अनुक्रमे भाजप व शिवसेनेत प्रवेश घेऊन निवडणुकीचे मैदान गाठले. यासोबतच अनेक इच्छुकांनी पक्षाने तिकीट नाकारल्याने अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला.
चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी ६६ जागांकरिता १७ प्रभागाची निर्मिती करण्यात आली आहे. मनपा निवडणुकीसाठी १९ एप्रिलला मतदान तर २१ ला मतमोजणी होणार आहे. दरम्यान ५ एप्रिलला नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी ५२७ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. भाजपाने सर्व ६६ जागांवर उमेदवार उभे केले. काँगे्रसने बंगाली कॅम्प प्रभागातील महिला गटातील उमेदवार वगळता ६५ जागांवर उमेदवार उतरविले. राष्ट्रवादी काँग्रेसने ३१, शिवसेने ६१ तर मनसेने १७ उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. या सोबतच विदर्भ माझा पार्टी प्रथमच रिंगणार उतरली असून ८ उमेदवार उभे केले आहेत. ७ एप्रिलला अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. त्यानंतर रणांगणातले खरे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या उमेदवारांनी आताच प्रचाराला सुरुवात केली आहे. सध्या सूर्य आग ओकत आहे. पारा ४३ अंशाच्या पार गेला आहे. सकाळी ९ वाजतापासूनच उन्हाचे चटके बसू लागले आहेत. दुपारी १२ वाजतानंतर तर घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. त्यामुळे बहुतांश उमेदवारांनी सकाळी ८ ते १२ हा वेळ प्रचारासाठी निवडला आहे. सध्या तरी याच सकाळच्या वेळेत उमेदवार प्रभागात नागरिकांच्या घरी जाऊन भेटी घेताना दिसून येत आहे. प्रचारासाठी केवळ बारा दिवस शिल्लक आहेत. दुपारच्या कडक उन्हात फिरणे व भरदुपारी नागरिकांच्या घरी जाऊन त्यांचे बोलणे ऐकणे टाळण्यासाठी उमेदवारांनी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. व्हाटॅसअप, फेसबुकच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. विद्यमान नगरसेवक तर केलेल्या कामाची यादीच व्हॉटस्अ‍ॅपवरून मतदारांच्या लक्षात आणून देत आहे. याशिवाय काही नगरसेवक बल्क मॅसेजचाही वापर केला जात आहे. याव्यतिरिक्त सर्वांना एकाच वेळी भ्रमणध्वनी करून उमेदवारांच्या प्रचाराची एक विशिष्ट टेप ऐकविली जात आहे. याद्वारे उमेदवार दुपारच्या पाच तासांचा चांगला वापर करीत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, नव्या प्रभाग पुनर्रचनेत प्रभागाच्या सीमा वाढविण्यात आल्याने लोकसंख्याही वाढली आहे. यामुळे जुन्या उमेदवारांचीच दमछाक होत असून नव्या उमेदवारांसमोर कमी दिवसात मतदारांपर्यंत कसे पोहचावे, हेच मोठे आव्हान उभे ठाकले आहे. (शहर प्रतिनिधी)

आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस
मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस ५ एप्रिल होता. या दिवशी ६६ जागांसाठी तब्बल ५२७ उमेदवारी अर्ज दाखल झाले. या उमेदवारी अर्जांची छाननी केल्यानंतर विविध कारणांमुळे १२ उमेदवारांचे नअर्ज अपात्र ठरविण्यात आले. आता ६६ जागांसाठी ५१५ उमेदवारी अर्ज दाखल आहेत. शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे. या दिवशी किती अर्ज मागे घेतले जातात आणि रिंगणात किती उमेदवार कायम असतील हे समजू शकणार आहे. त्यानंतर ८ एप्रिलला उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाणार आहे. ९ एप्रिलपासून खऱ्या अर्थाने प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात होणार आहे.

Web Title: Smoke on the candidates' social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.