तालुक्यातील घाटांवर रेती तस्करी सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 12:32 AM2018-04-06T00:32:35+5:302018-04-06T00:32:35+5:30
तालुक्यातील बहुतांश रेतीघाटांवर पोकलॅन्डचा अवैध वापर करून मोठ्या प्रमाणात रेतीचे खनन सुरू आहे. याविरुद्ध नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या. मात्र, तालुका प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने कोट्यवधींचा महसूल बुडत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : तालुक्यातील बहुतांश रेतीघाटांवर पोकलॅन्डचा अवैध वापर करून मोठ्या प्रमाणात रेतीचे खनन सुरू आहे. याविरुद्ध नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या. मात्र, तालुका प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने कोट्यवधींचा महसूल बुडत आहे.
तालुक्यातील रेती उत्तम दर्जाची दजार्ची असल्यामुळे बहुतांश कंत्राटदार रेती घाटांची लिलावात खरेदी करून जिल्ह्याबाहेर वाहतूक करीत आहेत. चिचाळा, हळदी, उश्राळा, भेजगांव, सुशी (दाबगाव) विरई, चितेगाव, राजोली, अंतरगाव पारडवाही येथील रेती घाटांचा लिलाव झाला आहे. तर काही घाटांचे अजुनपर्यंत लिलाव झाले नाही. परंतु यातील काही घाटांमधून दररोज लाखो रूपयांच्या रेतीचे अवैध खनन करून हायवा ट्रकद्वारे मूल शहरातून चंद्रपूर व इतर तालुक्यांत वाहतुक केली जात आहे. उपविभागीय अधिकारी, तहसील कार्यालयासमोरून हे ट्रक दिवसाढवळ्या जात असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे. तालुका व जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये मोठया प्रमाणावर घरांचे बांधकाम सुरू आहे. रेतीशिवाय हे बांधकाम शक्य नाही. तसेच रॉयल्टी देऊन रेतीची विक्री करणेही कंत्राटदारांना शक्य नसल्याने मोठ्या प्रमाणावर अवैध खनन करून विक्री केली जात आहे. सुर्योदयापासून तर सूर्यास्तपर्यंतच खनन करता येते. परंतु, तालुक्यातील काही रेती घाटांवरून पोकलँडचा वापर करून रात्रीबेरात्री अवैध खनन करून वाहतुक केली जात आहे. या रेती वाहतुकीमुळे काही गावांतील रस्ते खराब झाल्याचा आरोप नागरिकांनी केला. तालुक्यातील काही रेती घाटातून नांदेड जिल्ह्याची रॉयल्टी तयार करून हॉयवा ट्रकच्या माध्यमातुन जिल्ह्यात एकाच रॉयल्टीवर दिवसभर रेती वाहतूक असल्याने तालुका प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
तालुक्यातील बहुतेक घाटांचे लिलाव झाले असून या घाटातून रेतीची वाहतुक झाली पाहिजे याकडे लक्ष दिले जात आहे. रेती वाहतुक बाहेरून होत असल्यास कारवाई करण्यासाठी भरारी पथक तयार करण्यात आले. या पथकाच्या माध्यमातुन लक्ष देणे सुरू आहे.
राजेश सरवदे, तहसीलदार, मूल