चुनाळा घाटाच्या वर्धा नदीपात्रातून रेतीची तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:26 AM2021-05-24T04:26:53+5:302021-05-24T04:26:53+5:30
सध्या तालुक्यात रेतीचा तुटवडा असून, मागणी वाढली आहे. परिसरात शासकीय कामासाठी खासगी कामे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने रेती तस्कर ...
सध्या तालुक्यात रेतीचा तुटवडा असून, मागणी वाढली आहे. परिसरात शासकीय कामासाठी खासगी कामे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने रेती तस्कर सक्रिय झाले आहेत. काही दिवसांवर पावसाळा आल्याने बांधकामे पूर्ण करण्याची धावपळ सुरू झाली आहे. त्यामुळे आजघडीला प्रतिट्रॅक्टर चार ते साडेचार हजार रुपये मोजावे लागत आहे. दिवसागणिक मागणी वाढत असल्याने रेती तस्करांनी आता वर्धा नदीवर धुमाकूळ घातला आहे. सध्या वर्धा नदीच्या चुनाळा घाटावर चुनाळासह राजुरा शहरातील चार ते पाच रेती तस्करांनी नदीपात्रात मोठमोठे खड्डे खोदून रेतीउपसा सुरू केला आहे. त्यांचा हा गोरखधंदा मागील काही महिन्यांपासून बेधडकपणे सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मुळात हाकेच्या अंतरावर नदीत रेती तस्करीला ऊत आला असतानासुद्धा महसूल कर्मचारी गप्प बसल्याने संशय बळावला आहे. या तस्करांचा दिवसागणिक उपद्रव वाढत असल्याने भविष्यात हेच तस्कर महसूल विभागावर भारी पडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.