तर साहित्य संमेलन होऊ देणार नाही
By Admin | Published: January 30, 2016 01:22 AM2016-01-30T01:22:48+5:302016-01-30T01:22:48+5:30
चंद्रपूर येथे शुक्रवारपासून सुरू झालेल्या विदर्भ साहित्य संमेलनात विदर्भ राज्याचा ठराव पारित करण्यात यावा, अन्यथा साहित्य संमेलन होऊ देणार नाही,
विदर्भ मुक्ती मोर्चाचा इशारा : विदर्भ राज्याचा ठराव पारित करण्याची मागणी
चंद्रपूर: चंद्रपूर येथे शुक्रवारपासून सुरू झालेल्या विदर्भ साहित्य संमेलनात विदर्भ राज्याचा ठराव पारित करण्यात यावा, अन्यथा साहित्य संमेलन होऊ देणार नाही, असा इशारा विदर्भ मुक्ती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिला.
विदर्भ मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष किशोर पोतनवार म्हणाले, येथे प्रारंभ झालेल्या साहित्य संमेलनात स्वतंत्र विदर्भावर एकही चर्चासत्र किंवा परिसंवाद ठेवण्यात आलेला नाही. साहित्य संमेलन विदर्भात आहे. त्यातही त्याचे आयोजन चंद्रपूरसारख्या ऐतिहासिक नगरीत होत आहे. मात्र या साहित्य संमेलनात स्वतंत्र विदर्भावर एकही चर्चासत्र किंवा परिसंवाद ठेवण्यात आलेला नाही. विदर्भ साहित्य संघाच्या नावातच विदर्भ असून विदर्भातील जनतेच्या पैशावर होत आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या संमेलनासाठी जिल्ह्याच्या नियोजनातून पाच लाख रुपयांचा निधी दिला. ते आणखी पाच लाख रुपये देणार आहेत. म्हणजेच विदर्भातील जनतेच्या विकासाचा पैसा खर्च करून होणाऱ्या साहित्य संमेलनात स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मुद्याला आयोजकांनी स्पर्शसुद्धा केला नाही. असे पोतनवार म्हणाले.
विदर्भाचे स्वतंत्र राज्य करावे, असा ठराव साहित्य संमेलनात पारित करावा, धानाच्या विविध वाणांचा शोध लावणारे विदर्भातील शेतकरी दादाजी खोब्रागडे, पुरस्कार परत करणारे शेतकरी झाडे व शेंद्रे यांचा सत्कार करण्यात यावा, अशी मागणी असल्याचे पोतनवार यावेळी म्हणाले. (प्रतिनिधी)