...तर वाचू शकतात हजारो कोविड रुग्णांचे प्राण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:26 AM2021-05-01T04:26:56+5:302021-05-01T04:26:56+5:30

चंद्रपूर : जिल्ह्यासाठी दरदिवशी २० मेट्रिक टनप्रमाणे दोन दिवसाआड ४० मेट्रिक टन ऑक्सिजन मंजूर आहे. परंतु, पुरेशा क्षमतेचे ...

... so the lives of thousands of Kovid patients can be saved! | ...तर वाचू शकतात हजारो कोविड रुग्णांचे प्राण!

...तर वाचू शकतात हजारो कोविड रुग्णांचे प्राण!

Next

चंद्रपूर : जिल्ह्यासाठी दरदिवशी २० मेट्रिक टनप्रमाणे दोन दिवसाआड ४० मेट्रिक टन ऑक्सिजन मंजूर आहे. परंतु, पुरेशा क्षमतेचे वायू टँकर न मिळाल्याने दरदिवशी फक्त २५ मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा होत आहे. ऑक्सिजनची तूट भरून काढल्यास प्रशासनाने तत्काळ शक्ती पणाला लावल्यास हजारो कोविड रुग्णांचे प्राण वाचू शकतात.

कोरोना उद्रेकामुळे सार्वजनिक आरोग्य सुविधांच्या मर्यादा उघड झाल्या. मात्र, रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तातडीच्या प्रतिबंधक उपाययोजना आणि आरोग्य सुविधांची प्रचंड वेगाने निर्मिती केली जात आहे. कोविडबाधित गंभीर रुग्णांसाठी ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत; पण, ऑक्सिजन तूट अद्याप भरून काढता आली नाही. त्यामुळे जिल्ह्याच्या वाट्याला येणारा लिक्विड ऑक्सिजन पूर्ण क्षमतेने उपलब्ध करून देणे प्रशासनासाठी आव्हान ठरले आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासूनच शासकीय व खासगी कोविड रुग्णालये फुल्ल झाली. वेळेवर ऑक्सिजन मिळत नसल्याने काही रुग्णांचे बळी गेले. मात्र, जिल्ह्यासाठी मंजूर झालेला दोन दिवसाआडचा ४० मेट्रिक टन ऑक्सिजन केवळ टँकर नसल्याने उचल करणे बंद आहे.

जिल्ह्याची रिफिलिंग क्षमता २३०० मेट्रिक टन

चंद्रपुरात आदित्य एअर व रुक्मिणी मेटॅलिक दोन कंपन्या रिफिलिंग करतात. एकूण क्षमता २३०० जम्बो सिलिंडर इतकी आहे. एका सिलिंडरमध्ये ७ हजार लिटर लिक्विड ऑक्सिजन असतो. आदित्यमध्ये दररोज ६० तर रुक्मिणीत ४० सिलिंडरमध्ये प्रेशरद्वारे ऑक्सिजन भरला जातो.

चंद्रपूर जिल्ह्याला भिलाईचा आधार

दर दोन दिवसाआड २५ मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन भिलाईतून येतो. यातील १० मे. ट. आदित्यला तर १५ मे. ट. रुक्मिणी मेटॅलिकला मिळतो. जिल्ह्यासाठी दरदिवशी २० मेट्रिक टन ऑक्सिजन मंजूर असूनही तो आणता येत नाही. नागपूरची ऑक्सिजन मागणी १८० तर उत्पादनक्षमता ८७ ते ९० मेट्रिक टन आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याला लिक्विड ऑक्सिजनसाठी मध्य प्रदेशातील भिलाईचाच आधार उरला आहे. त्यातही वाहतुकीसाठी ३६ तास खर्ची होतात.

गडचिरोलीत जातात ५०० तर वणीत ६० सिलिंडर

चंद्रपुरातील दोन कंपनीतून गडचिरोली जिल्ह्यात दररोज ५०० तर यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील कोविड हॉस्पिटला ६० सिलिंडर जातात. एक तासात फक्त ४० सिलिंडर भरता येतात. एक वाहन भरण्यापूर्वीच दुसरी वेटिंगवर असते. टाईम लिमिटमुळे हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन पोहोचण्यास विलंब होतो.

वायू टँकर का मिळाले नाही?

प्रत्येक राज्यांत ऑक्सिजन मागणी वाढली. राज्य व जिल्ह्यांनी स्वत:कडे उपलब्ध असलेले वायू टँकर ताब्यात घेतले. चंद्रपूर जिल्ह्यासाठी सध्या दोन टँकरद्वारे लिक्विड ऑक्सिजन वाहतूक होते. एकाची १० मेट्रीक टन तर दुस-या टँकरची क्षमता १५ मेट्रिक टन आहे. पूर्ण क्षमतेचे टँकर मिळाले असते तर जिल्ह्याचा प्रतिदिवस मंजूर २० मेट्रिक टन याप्रमाणे दोन दिवसांत ४० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा झाला असता.

नैसर्गिक ऑक्सिजन प्लांटवर मदार

जिल्हा प्रशासनान राजुरा, वरोरा, चिमूर, मूल व ब्रह्मपुरी तालुक्यात नैसर्गिक हवेतून ऑक्सिजन तयार करण्याचा प्लांट टाकण्याचा निर्णय घेतला. कामाला सुरुवातही झाली. प्रेशर स्वींग अ‍ॅडसोप्रेशन ही यंत्रणा पाचही तालुक्यांत लावण्यात येणार आहे. त्यातून थोडा ऑक्सिजन भार कमी होईल. पण, प्लांट उभारणी कालावधी व ऑक्सिजन कॉन्सट्रेटरला मर्यादा आहेत. जिल्ह्याचा मंजूर लिक्विड ऑक्सिजन आणण्यासाठी वायू टँकर उपलब्ध झाल्यास डोळ्यांदेखतचा मृत्यूतांडव रोखता येऊ शकतो.

कोट

चंद्रपूर जिल्ह्यातील उत्पादित २३०० जम्बो ऑक्सिजन सिलिंडर संपूर्ण क्षमतेने पुरवठा करणे सुरू आहे. जिल्ह्याकरिता प्रतिदिवस २० मेट्रीक टन लिक्विड ऑक्सिजन मंजूर आहे. परंतु, सध्या वायू टँकर उपलब्ध नाही. यासंदर्भात वरिष्ठांकडे पाठपुरावा करण्यात आला. यावर निश्चितपणे तोडगा निघू शकेल.

- नितीन मोहिते, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, चंद्रपूर

Web Title: ... so the lives of thousands of Kovid patients can be saved!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.