सावित्रीच्या चिकित्सक शैक्षणिक विचारांची समाजाला गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:33 AM2021-01-08T05:33:24+5:302021-01-08T05:33:24+5:30
चंद्रपूर : क्रांतिज्योती सावित्रींच्या शैक्षणिक, सामाजिक कार्यामुळेच आज महिलांना सुरक्षित, संपन्न, स्वतंत्र व निर्णयक्षम जीवन जगता येत आहे. ...
चंद्रपूर : क्रांतिज्योती सावित्रींच्या शैक्षणिक, सामाजिक कार्यामुळेच आज महिलांना सुरक्षित, संपन्न, स्वतंत्र व निर्णयक्षम जीवन जगता येत आहे. उच्च शिक्षण घेऊन महिला सर्वच महत्त्वाच्या पदांवर पोहोचल्या आहेत. त्यामुळे आज समाजाला सावित्रीच्या शैक्षणिक, चिकित्सक विचारांची, सर्जनशील, सुसंवादाची व अज्ञानावर मात करून समाजप्रबोधनाची गरज असल्याचे मत शिवगिरिजा बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या अल्का ठाकरे यांनी व्यक्त केले.
मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड चंद्रपूरद्वारा आयोजित क्रांतिज्योती सावित्री फुले जयंती तथा प्रथम महिला शिक्षण दिन ते १२ जानेवारी राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ यांच्या जयंती सावित्री-जिजाऊ दशरात्रौत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष दीपक खामणकर होते. प्रमुख मार्गदर्शिका म्हणून अल्का ठाकरे उपस्थित होत्या. यावेळी जिजाऊ ब्रिगेड, चंद्रपूरच्या जिल्हाध्यक्ष वनिता गाडगे-आसुटकर, प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्त्या वैशालीताई भेदे, ॲड. मनोज मांदाडे, आदींची यावेळी उपस्थिती होती.
ठाकरे म्हणाल्या, आजच्या शिकलेल्या स्त्रियांनी केवळ पूजाअर्चेत स्वतःला पूर्णपणे गुंतवून न घेता व बुवा-बापूंच्या नादी न लागता सावित्रीचे शैक्षणिक चिकित्सक विचार आचरणात आणावेत. नवस करणे, द्वेष पसरविणे, अंधश्रद्धेला बळी पडणे हे क्रांतिज्योती सावित्रीआईला अपेक्षित नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष दीपक खामणकर यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. वनिता गाडगे-आसूटकर यांनी प्रास्ताविक केले. संचालन जिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय अध्यक्षा मीनाक्षी ढुमणे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्षा कविता गोखरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड व इतर कक्षांचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.