‘सॉफ्ट ड्रिंक्स’ आरोग्यास ठरू शकते धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 10:42 PM2019-05-30T22:42:45+5:302019-05-30T22:43:35+5:30
तापत्या उन्हात डिहायड्रेशनपासून वाचण्यासाठी अनेक जण ‘सॉफ्ट ड्रिंक्स’ सेवन करतात, मात्र ‘सॉफ्ट ड्रिंक्स’ च्या अतिसेवन शरीरासाठी अपायकारक असून, युवकांसह नागरिकांनी यापासून सावध रहावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : तापत्या उन्हात डिहायड्रेशनपासून वाचण्यासाठी अनेक जण ‘सॉफ्ट ड्रिंक्स’ सेवन करतात, मात्र ‘सॉफ्ट ड्रिंक्स’ च्या अतिसेवन शरीरासाठी अपायकारक असून, युवकांसह नागरिकांनी यापासून सावध रहावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
उन्हाळ्यामध्ये सॉफ्ट ड्रिंक्सची मागणी वाढते. यावर्षी तापमानात प्रचंड प्रमाणात वाढ होत असल्याने मागणी वाढली आहे. ‘सॉफ्ट ड्रिंक्स’ मध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते शरीराला हानिकारक आहे. बाजारात अनेक कंपन्यांचे सॉफ्ट ड्रिंक्स उपलब्ध आहेत. यामुळे मेटाबॉलिक सिंड्रोम, फॅट व हाय कोलेस्टेरॉलच्या समस्या वाढतात. ज्या हृदय आजाराचे कारण ठरू शकते.
तापमान वाढल्याने मागणीत झपाट्याने वाढ
तापमानाचा पारा चढला, तसा सॉफ्ट ड्रिंक्सचा खपही वाढला असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. शहरातील विविध भागात सॉफ्ट ड्रिंक्सची विक्री होत आहे. अनेक जण उन्हाळ्यात इतर पेयांऐवजी सॉफ्ट ड्रिंक्सला जास्त पसंती देतात. यात युवा वर्गाचे प्रमाण सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे, शहरी तसेच ग्रामीण भागातही मागणी वाढली आहे.
कॅलरी, शुगरचे गणित
सॉफ्ट ड्रिंक्ससारखे पेय आणि पदार्थात न्युट्रीशनल व्हॅल्युसोबतच कॅलरीदेखील असते. दोन लिटर सॉफ्ट ड्रिंक्समध्ये प्रत्येक १०० एमएलमध्ये ४४ कॅलरी एनर्जी आणि ११ ग्राम शुगर असते. महिलांना एका दिवसात २० ते २४ ग्राम साखरेची आवश्यकता असते, तर पुरुषांना एका दिवसात ३० ते ३४ ग्राम साखरेची आवश्यकता आहे. लहान मुलांना १२ ग्राम साखर गरजेची आहे. परंतु ३५५ एमएल सॉफ्ट ड्रिंक्स प्यायल्यामुळे ३९ ग्राम साखर शरीरात जाते आणि त्यामुळे १५६ कॅलरी वाढत असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. त्यामुळेच सॉफ्ट ड्रिंक्स पिणे आरोग्यासाठी अतिशय घातक आहे.
आरोग्यास घातक
सॉफ्ट ड्रिंक्स सतत प्यायल्यामुळे अनेक आजार बळावतात. जंक फूड आणि कोल्ड ड्रिंक्स हे कॉम्बिनेशन स्थूलता वाढवते. युवकांमध्ये सॉफ्ट ड्रिंक्स पिण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोड्यामध्ये सर्वाधिक कॅलरीज असतात. ज्यांना शुगरचा त्रास आहे त्यांना याचा जास्त धोका आहे. सॉफ्ट ड्रिंक्समुळे दात ठिसूळ होतात. हे थंड पेय आरोग्यासाठी घातक ठरत आहे. यामुळे हृदयाचे आजार, दाताचे आजार, लठ्ठपणा येण्याची शक्यता असते.
पर्याय अनेक
गर्मीपासून वाचण्यासाठी बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. लिंबू सरबत, उसाचा रस, नारळ पाणी, लस्सी आदींचे सेवन करावे. यामुळे शरीराला कुठलीच हानी होत नाही. उलट फायदाच होतो, असा दावा डॉक्टरांनी केला आहे.
आजाराची शक्यता
उन्हाळ्यात तहान भागविण्यासाठी सॉफ्ट ड्रिंक्स पिणे धोकादायक आहे. कारण त्यात कॅलरी सर्वाधिक असतात. ज्या अनेक आजारांना निमंत्रण देतात. लहान मुलांना सॉफ्ट ड्रिंक्स फार आवडते. त्यामुळे पालक अगदी सहज त्यांना सॉफ्ट ड्रिंक्स घेवून देतात. परंतु यामुळे त्यांचे दात कमकुवत होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.