चांदा ते बांदा योजनेतून ‘सोलर चरखा क्लस्टर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 11:03 PM2019-07-18T23:03:58+5:302019-07-18T23:04:25+5:30

चांदा ते बांदा योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील चार तालुक्यात सोलर चरखा क्लस्टर करण्यात येत असल्याची माहिती वनमंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

Solar Charkha cluster from Chanda to Banda Yojana | चांदा ते बांदा योजनेतून ‘सोलर चरखा क्लस्टर’

चांदा ते बांदा योजनेतून ‘सोलर चरखा क्लस्टर’

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार यांची माहिती : जिल्ह्यातील चार तालुक्यांची निवड

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चांदा ते बांदा योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील चार तालुक्यात सोलर चरखा क्लस्टर करण्यात येत असल्याची माहिती वनमंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, पोंभुर्णा, गोंडपिंपरी आणि राजुरा तालुक्यामध्ये हे सोलर चरखा क्लस्टर करण्यात येत असल्याचे सांगून ना. मुनगंटीवार म्हणाले, या नावीन्यपूर्ण कामास राज्यस्तरीय समितीने ८ जानेवारी २०१९ रोजीच्या बैठकीत मान्यता दिली होती.
त्यानुसार आता या कामासाठी ८१३ लाख एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यासंबंधीचे प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना विशेष बाब म्हणून देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
केंद्र आणि राज्य शासन महात्मा गांधीजी यांची १५० वी जयंती साजरी करीत आहे. या पार्श्वभूमीवर सोलर चरखा क्लस्टरच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देताना खादीला प्रोत्साहन देण्याचे धोरणही शासनाने स्वीकारले आहे. भारतीय स्वातंत्र्य लढयाचे आणि स्वदेशी चळवळीचे प्रतिक म्हणून चरख्याकडे पाहिले जाते. जिल्ह्यात मोठया प्रमाणात कापूस पिकाखालील क्षेत्र आहे. परंतु कापसापासून तयार होणाऱ्या गाठी, पुढील प्रक्रिया करणारे उद्योग या भागात नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या नगदी पिकाला योग्य भाव मिळत नाही.
हेच लक्षात घेऊन चांदा ते बांदा या पथदर्शी विकास योजनेतून खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मदतीने कापूस ते कापड प्रकल्प सुरु करण्याचा, कापसाचे मूल्यवर्धन करून या पिकाला चांगला भाव देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
यातून स्थानिक भागातील महिलांना रोजगार उपलब्ध होऊन त्यांचे सक्षमीकरण होण्यास देखील मदत होणार आहे.
खादीचे उत्पादन वाढविण्यावर भर
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खादीचा पुरस्कार केला आहे. आता तरूणांमध्येही खादी लोकप्रिय होत आहे. मोठमोठया वस्त्रोद्योग कंपन्या खादी गारमेंट उत्पादनात उतरत आहेत. या पार्श्वभूमीवर चरख्यांच्या माध्यमातून खादीचे उत्पादन वाढवण्याचा हा प्रयत्न आहे. पारंपरिक अंबर चरख्यावर होणारी सुतकताई, त्यासाठी महिलांना घ्यावे लागणारे परिश्रम, मिळणारे अत्यल्प उत्पन्न, उत्पादन आणि सुताचा दर्जा यामध्ये अमुलाग्र सुधारणा सोलर चरख्यांच्या माध्यमातून करणे शक्य झाले आहे. त्यामुळेच शासनाच्या खादी व ग्रामोद्योग मंडळाकडून मोठया प्रमाणात सोलर चरख्याचा पुरस्कार केला जात असल्याची माहितीही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

Web Title: Solar Charkha cluster from Chanda to Banda Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.