सौरऊर्जा पंप भागवितात तहान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 12:01 AM2018-04-20T00:01:29+5:302018-04-20T00:01:29+5:30
कोट्यवधी रूपये खर्चून नजरेला भिडणाऱ्या गगनचुंबी इमारती आणि भव्य योजनांच्या उभारणीतच ‘विकास’ दडला, या अभिनिवेशात काही लोकप्रतिनिधी धन्यता मान्यतात. मात्र, निसर्गानुकूल व संतुलित योजनांची अंमलबजावणी करताना आढेवेढे घेतात.
राजेश मडावी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोट्यवधी रूपये खर्चून नजरेला भिडणाऱ्या गगनचुंबी इमारती आणि भव्य योजनांच्या उभारणीतच ‘विकास’ दडला, या अभिनिवेशात काही लोकप्रतिनिधी धन्यता मान्यतात. मात्र, निसर्गानुकूल व संतुलित योजनांची अंमलबजावणी करताना आढेवेढे घेतात. २००९-१० मध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमअंतर्गत जिल्ह्यात ३०८ सौर दुहेरी पंप लघुनळ पाणी पुरवठा योजना सुरू झाली होती. यातील बहुतेक पंप सुरळीत असून वीज भाराचा खर्चही निरंक आहे. भीषण टंचाईच्या काळात तहान भागविणारे हे सौरऊर्जा पंप शेकडो कुटुंबांना शाश्वत पुरवठा करीत आहे. त्यामुळे अशा पंपांची संख्या का वाढवू नये, असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.
जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी मुबलक पाणी पुरवठा योजना व वीजेची समस्या आहे. त्यामुळे नागरिकांना विजेवर आधारित पंपाद्वारे पिण्याच्या पाण्याची गरज भागविताना अडचणींचा सामना करावा लागतो. जिवती, कोरपना, राजुरा या तालुक्यातील आदिवासी पाड्यांमध्ये दरवर्षी पाणी टंचाईने नागरिकांचे हाल होतात. राज्य शासनाच्या विविध योजनांमधून मोठ्या गावांमध्ये पाणी पुरवठा योजना सुरू झाली. बºयाच ग्रामपंचायतींनी स्वत:च्या उत्पन्नातील महत्त्वाचा वाटा या योजनेसाठी खर्ची घालत आहेत. मात्र दीर्घकालीन योजनेचा अभाव व वर्षभर विजेची समस्या असणाºया गावांमध्ये पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यामुळे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत २००९-१० पासून जिल्हा परिषदच्या यांत्रिकी उपविभागाच्या अखत्यारित सौर दुहेरी पंप लघुनळ पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली. जिल्ह्यात ३०८ सौर दुहेरी पंप सुरू आहेत. यासाठी ५ लाखांची मर्यादा आहे. सौरउर्जा पंपांची देखरेख करण्याची जबाबदारी जि.प. यांत्रिकी उपविभागाकडे देण्यात आली. आर्थिक खर्चाविना ग्रामस्थांना पिण्याचे मुबलक पाणी मिळत असल्याने योजनेची व्याप्ती वाढवावी, अशी अपेक्षा लाभार्थी गावातील सरपंचांनी व्यक्त केली आहे.
अशी होते पाणी साठवण
सौर ऊर्जा योजनेमध्ये विंधन विहिरींवर हात पंपासोबत सौर पंपाची उभारणी केली जाते. सौर ऊर्जा पंपाचा उपसर्ग साठवण टाकीत साठविल्यानंतर पाईप लाईनद्वारे घरोघरी पाणीपुरवठा केला जातो. हातपंप व सौर पंपाची उभारणी स्वतंत्ररीत्या विंधन विहिरीत करण्यात आली आहे. त्यामुळे हातपंप बिघडल्यास झाल्यास सौरपंप किंवा सौरपंप नादुरूस्त झाल्यास हातपंपाद्वारे नियमितपणे पाणी पुरवठा सुरू राहतो. हा पंप सौरऊर्जेवर चालत असल्याने विद्युतभाराचा खर्च शून्यावर आला आहे. ग्रामस्थांनी या पंपाची काळजीपूर्वक हाताळणी केल्यास जलसंकट दूर होईल.