सोलारपंप चोरले, ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाले; वनविभागाने ठोकल्या बेड्या
By परिमल डोहणे | Updated: April 2, 2024 18:16 IST2024-04-02T18:13:16+5:302024-04-02T18:16:42+5:30
श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजना अंतर्गत वन विभागातर्फे सोलार बोर लावण्यात आली होती.

सोलारपंप चोरले, ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाले; वनविभागाने ठोकल्या बेड्या
चंद्रपूर : सावली वनपरिक्षेत्रातील उपवनक्षेत्र पाथरी अंतर्गत नियतक्षेत्र मेहा येथील गावकऱ्यांच्या सोयीकरिता लावण्यात आलेले सोलार पंप चोरल्याची घटना १६ मार्च रोजी उघडकीस आली होती. वनविभागाने यावेळी परिसरातील ट्रॅप कॅमेऱ्याची पाहणी केली असता, चोरटे त्या कॅमेऱ्यात कैद झाले. त्याआधारे वनविभागाने कसून चौकशी करून मंगळवारी चोरी केलेल्या तीन चोरट्यांना बेड्या ठोकून मुद्देमाल हस्तगत केला. विलास लालाजी उंदिरवाडे (३३), सदाशिव वारलू मेश्राम (४७), शरद रविंद्र उंदिरवाडे (२३) तिघेही रा. गायडोंगरी ता. मेहा असे अटकेतील आरोपींची नावे आहेत.
श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजना अंतर्गत वन विभागातर्फे सोलार बोर लावण्यात आली होती. बोरवेलचे पाणी टंचाईच्या काळात पाण्याचा संपूर्ण ग्रामवासियांना उपयोग होत होते. दरम्यान वनरक्षक संदीप चुधरी हे वनगस्त करीत असताना सोलार बोरवेल चोरीला गेल्याचे निदर्शनास १६ मार्च रोजी आले. याबाबतची माहिती त्यांनी वरिष्ठ कार्यालयास कळविली. तसेच पाथरी पोलिस ठाण्यात वनविभागाच्या मालकीची सोलार मोटार पंप चोरीला गेल्याची तक्रार केली होती. वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात सोलार बोरवेल चोरी करतानाचे फोटो ट्रॅप झाले होते. त्याआधारे वनविभागाने कसून चौकशी केली व मंगळवारी चोरी केलेल्या मुद्देमालासह आरोपीस वनविभागाने अटक केली. ही कारवाई चंद्रपूरचे विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे, चंद्रपूरचे सहायक वनसंरक्षक घनश्याम नायगमकर यांच्या मार्गदर्शनात सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे, पाथरीचे क्षेत्रसहायक एन. बी. पाटील, मेहा बुजचे वनरक्षक संदीप चुधरी आदींनी कारवाई केली. तपासासाठी गेवराचे वनरक्षक श्रीराम आदे, पाथरीचे खेमराज गोडसेलवार, खानाबादच्या वनरक्षक कल्याणी पाल, पालेबारसाच्या यामिना पोईनकर, अतीन मानकर आदींनी सहकार्य केले. पुढील तपासाकरिता पाथरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.