पर्यायी मोटार हाच ‘तपाळ’ वरील उपाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2017 12:47 AM2017-06-12T00:47:03+5:302017-06-12T00:47:03+5:30
गेल्या आठ दिवसांपासून नागभीडला पाणीपुरवठा करणारी तपाळ पाणीपुरवठा योजना बंद आहे.
घनश्याम नवघडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : गेल्या आठ दिवसांपासून नागभीडला पाणीपुरवठा करणारी तपाळ पाणीपुरवठा योजना बंद आहे. तरी तपाळ योजना चालविणारा जि.प.चा पाणीपुरवठा विभाग कुंभकर्णी झोपेतच आहे. जि.प.च्या या वेळकाढू धोरणाबद्दल नागभीडमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या ठिकाणी नियमित पर्यायी मोटर ठेवावी, असेही बोलले जात असून पाणी पुरवठा खंडीत होऊ नये यासाठी हाच पर्याय योग्य आहे.
वैनगंगेच्या काठावरील तपाळ गावात ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. म्हणूनच या योजनेला तपाळ हे नाव देण्यात आले. तपाळ ते नागभीड हे अंतर जवळपास ३० किमीचे आहे. मधल्या काळात पाईप लाईनमध्ये समस्या उद्भवत असल्याने पाणीपुरवठा प्रभावीत व्हायचा. पण गेल्या वर्षभरात ही समस्या उद्भवल्याचे ऐकिवात नसले तरी केवळ एका मोटारीमुळे नागभीड व या योजनेतील समाविष्ट गावांना वारंवार पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे, हे वास्तव आहे.
दोन महिन्या अगोदर ही योजना अशीच पंधरा दिवस बंद होती. तेव्हा संतप्त नागभीडकरांनी नगर परिषदेवर हल्लाबोल आंदोलन केले होते. एका मोटारीमुळे ही योजना नेहमीच बंद राहते. म्हणून दुसरी एक राखीव मोटार ठेवावी. जेणेकरून एक मोटार बंद पडली की, लगेच दुसरी मोटर लावता येईल व पाणीपुरवठा सुरळीत राहील, अशी आंदोलकांची मागणी होती. उल्लेखनीय बाब ही की, तसे या योजनेत प्रावधानही आहे.
यावेळी अतिशय कडेकोट पोलीस बंदोबस्तात नगर परिषदेत आलेल्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी आंदोलकांची ही मागणी मान्य केली होती, अशी माहिती आहे. पण दोन महिन्यानंतरही दुसऱ्या मोटारची व्यवस्था करण्यात आली नाही आणि नागभीड व या योजनेत समाविष्ट गावांना परत त्याच समस्येला सामोरे जावे लागले आहे. आता ऐन उन्हाळ्याच्या दिवसात गेल्या आठ दिवसांपासून लोकांना पाणी मिळत नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत असला तरी जि.प.चा पाणीपुरवठा विभाग साखर झोपेतच आहे. जेव्हा जेव्हा योजना बंद पडत गेली, तेव्हा तेव्हा सदर प्रतिनिधीने जि.प. च्या पाणीपुरवठा विभागाशी चर्चा केली. मात्र नागभीड नगर परिषदेकडून पाणीपट्टी कराची वसुली नियमित येत नसल्याने आम्ही कामे कशी करायची, असा युक्तीवाद करण्यात येतो. या गोष्टीत तथ्य असले तरी नागभीड नगर परिषदेनेही ज्यांची पाणीपट्टी थकीत असेल त्यांच्यावर कारवाई करावी व पाणीकर भरून जि.प.च्या पाणीपुरवठा विभागाला सहकार्य करावे. अन्यथा ही समस्या उद्भवतच राहील.