विकासाच्या प्रवाहात पाणी समस्येचे निराकरण हाच निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 11:44 PM2018-04-14T23:44:32+5:302018-04-14T23:44:32+5:30
ऊर्जानगर परिसरातील नागरिकांची पाणी पुरवठा योजनेची मागणी पूर्णत्वास आली आहे. आपल्या सततच्या पाठपुराव्यामुळे सन २०१३ मध्ये या पाणी पुरवठा योजनेला मान्यता देणारा शासन निर्णय निर्गमित झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ऊर्जानगर परिसरातील नागरिकांची पाणी पुरवठा योजनेची मागणी पूर्णत्वास आली आहे. आपल्या सततच्या पाठपुराव्यामुळे सन २०१३ मध्ये या पाणी पुरवठा योजनेला मान्यता देणारा शासन निर्णय निर्गमित झाला. आज ८ कोटी ७८ लक्ष रूपये किंमतीची पाणी पुरवठा योजना खनिज विकास निधीच्या माध्यमातून पूर्णत्वास आली आहे. येथील नागरिकांना शुद्ध व मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे हा आपला निर्धार असून या निधार्राच्या पूर्ततेसाठी आपण सदैव कटिबध्द असल्याचे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
१४ एप्रिल रोजी चंद्रपूर तालुक्यातील ऊर्जानगर येथे खनिज विकास निधीच्या माध्यमातून मंजूर पाणी पुरवठा योजनेच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी नळाचे उद्घाटन करून एक वृक्ष लावून योजनेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी आ. नाना श्यामकुळे, यांनी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील विकास योजनांची माहिती दिली. जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हा परिषद सदस्य वनिता आसुटकर, पंचायत समितीच्या सभापती वंदना पिंपळशेंडे, भाजपा नेते रामपाल सिंह, उर्जानगरच्या सरपंच लिना चिमुरकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. प्रास्ताविक जगतारे यांनी केले.
अनेक गावांत पाणी पुरवठा योजना
विकासकामांसोबत नेहमीच पाणी पुरवठयाच्या प्रश्नाला आपण नेहमीच अग्रक्रम दिला आहे. बल्लारपूर तालुक्यातील १८ गावांसाठी ३५ कोटी किंमतीची ग्रीड पध्दतीची प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, मूल तालुक्यातील २४ गावांसाठी ४६ कोटी रूपये किंमतीची ग्रीड पध्दतीची प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, मूल तालुक्यातील चिचाळा व उथळपेठ येथे जलशुध्दीकरण केंद्र, मूल तालुक्यातील चिचाळा व नजिकच्या सहा गावांना सिंचन सुविधा पुरविण्यासाठी २३ कोटी ४७ लक्ष ५४ हजार रूपये निधीची योजना, बल्लारपूर तालुक्यातील कोठारी येथे ३ कोटी १८ लाख रूपये किंमतीची पाणी पुरवठा योजना अशा विविध योजनांना मंजुरी देत पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाला आम्ही प्राधान्य दिले आहे, असेही ना. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.