प्राथमिक शिक्षकांच्या समस्या मार्गी लावणार
By admin | Published: May 10, 2017 12:56 AM2017-05-10T00:56:11+5:302017-05-10T00:56:11+5:30
महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा चंद्रपूरच्या वतीने प्रभारी शिक्षणाधिकारी प्राथमिक नीलेश पाटील यांच्याशी प्राथमिक शिक्षकांच्या समस्या
नीलेश पाटील : समस्या सोडविण्याचे पुरोगामी शिक्षक संघटनेला आश्वासन
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा चंद्रपूरच्या वतीने प्रभारी शिक्षणाधिकारी प्राथमिक नीलेश पाटील यांच्याशी प्राथमिक शिक्षकांच्या समस्या व साखळी उपोषण संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी सकारात्मक प्रतिसाद देत न्याय मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी पुरोगामी संघटनेच्या वतीने २४ एप्रिल रोजी केलेल्या एक दिवसीय धरणे आंदोलनाची माहिती व प्रलंबित मांगण्याची यादी तसेच करणार असलेल्या साखळी उपोषणाची माहिती यावेळी देण्यात आली. शिक्षण विभाग चंद्रपूरच्या वेळकाढू धोरणाने अनेक समस्या प्रलंबित राहत आहेत. यावर जोर देण्यात आला. यासाठी तालुका प्रशासन मोठ्या प्रमाणात कारणीभूत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली.
चर्चेच्या वेळी संघटनेच्या निवेदन व पाठपुराव्याची दखल घेत खालील समस्या सुटल्यामुळे प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात आले. यात जिवती तालुका संपूर्ण अवघड घोषित करण्यात आला, जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना भारमुक्त करण्यात आले, जिल्हा बदलीसाठी अर्ज करणारऱ्या ७८ शिक्षकांचे स्थायी आदेश निर्गमित करण्यात आले. यासह विषय शिक्षक पदस्थापनेत विज्ञान पदवीधरांना प्राधान्य देण्याचे मान्य करण्यात आले, क्षिकांच्या समस्यांना गांभीर्याने न घेणाऱ्या तालुका प्रशासनाला कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आला, निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी तालुक्यांना पात्र शिक्षकांचे प्रस्थाव मागण्यात आले, आदी मागण्यांबाबत तत्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले.
चर्चेच्या वेळी पुरोगामीचे अध्यक्ष विजय भोगेकर, सरचिटणीस हरीश ससनकर, महिला अध्यक्ष अल्का ठाकरे, महिला मंच पदाधिकारी चंदा खांडरे, सुनीता इटनकर, प्रतिभा उदापुरे, शालिनी देशपांडे, तालुका पदाधिकारी निखिल तांबोळी, विपिन धाबेकर, दिवाकर वाघे, पंकज उध्दरवार उपस्थित होते.