कुणी सेफ्टी पीन गिळतो, कुणाच्या नाकात शेंगदाणा, तर कुणाच्या नाकामध्ये गहू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:33 AM2021-09-09T04:33:56+5:302021-09-09T04:33:56+5:30
चंद्रपूर : आई-वडिलांच्या नजरेआड झालेली बालके कधी संकट आणतील याचा नेम नसतो. त्यामुळे लहान बालकांकडे पूर्णवेळ लक्ष ठेवणे गरजेचे ...
चंद्रपूर : आई-वडिलांच्या नजरेआड झालेली बालके कधी संकट आणतील याचा नेम नसतो. त्यामुळे लहान बालकांकडे पूर्णवेळ लक्ष ठेवणे गरजेचे आहे. मुले खेळत असले तरी, ती खेळता-खेळता स्वत:लाच नुकसान कसे पोहोचवतील याचा नेम नाही. लहान मुले खेळताना अनेकवेळा सेफ्टी पीन गिळतात, काही मुले घरातील लोकांची औषधी खातात. तसेच शेंगदाणे, फुटाणे तोंडात टाकताना नकळत नाकातही टाकतात. अशावेळी लहान मुलांच्यासंदर्भात परिस्थिती अत्यंत धोकादायक असते. अनेकवेळा शस्त्रक्रिया करावी लागते, तर काही बालकांचा यात मृत्यूदेखील होतो. चंद्रपूर जिल्ह्यात अशा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे बालक आठ ते नऊ वर्षांचे होईपर्यंत विशेष लक्ष द्यावे लागते.
बाॅक्स
मुले काय करतील याचा नेम नाही
सुटे पैसे तोंडात टाकून ठेवत असल्याने अनेकवेळा ते पोटात जातात.
सेफ्टी पीन किंवा इतर साहित्य तोंडात घालतात. त्यामुळे अडचण होते.
खेळता - खेळता गहू, हरभऱ्याची डाळ या वस्तू नाकात घालत असल्याने त्या श्वसननलिकेत अडकतात.
घरातील लोकांनी आपल्या आजारासाठी आणलेली औषधे खिडकी किंवा कपाटात ठेवलेली असतात. ती औषधे लहान मुले सेवन करतात.
जिल्ह्यात अशा अनेक घटना घडल्या आहेत.
बाॅक्स
अशी घ्या मुलांची काळजी...
लहान मुले खेळत असतील, तर आपली नजर चुकवून ती असे साहित्य तोंडात किंवा नाकात घालत असतात. त्यासाठी त्यांच्याकडे लक्ष द्या.
उंदिर मारण्याचे औषध, आजारासाठी वापरण्यात येणारी औषधे बाहेर ठेवू नका.
खेळत असलेल्या मुलांनी काही खाल्ले तर नाही ना? याची शहानिशा करा. घातक वस्तू त्यांच्या हाती लागणार नाहीत याची खबरदारी घ्या.
कोट
लहान मुले अनेकवेळा नकळत काही वस्तू गिळतात. अशावेळी अन्ननलिका, श्वसननलिकेत अडकलेली वस्तू काढण्यासाठी शस्त्रक्रियाही करावी लागते. त्यामुळे लहान मुलांकडे पुरेसे लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा त्यांच्या जिवावरही बेतू शकते.
- निशिकांत टिपले
बालरोगजतज्ज्ञ, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर