रिक्षाचालकांचे कधी राईट, तर कधी लेफ्ट, पळवापळवीने प्रवाशांचा वैताग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:30 AM2021-09-21T04:30:51+5:302021-09-21T04:30:51+5:30
चंद्रपूर :मागील काही दिवसांत शहरात ऑटोची संख्या वाढली आहे. यामुळे प्रवाशांना जाणे-येणे सोईचे झाले असले तरी काही ऑटोचालक वाट्टेल ...
चंद्रपूर :मागील काही दिवसांत शहरात ऑटोची संख्या वाढली आहे. यामुळे प्रवाशांना जाणे-येणे सोईचे झाले असले तरी काही ऑटोचालक वाट्टेल तिथे ऑटो थांबवित असल्यामुळे इतर वाहनधारकांना त्रासदायक होत आहे. प्रवाशी मिळविण्याच्या नादात वाहतुकीच्या नियमांचीही ऐशीतैशी होत आहे. वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.चंद्रपूर शहरातील वाहनांच्या संख्येच्या तुलनेमध्ये रस्ते मात्र निमुळते आहे. गांधी चौक ते जटपुरा गेट परिसरात तर वाहतुकीची कोंडी नित्याचीच आहे. प्रत्येक जण वाहनांच्या कोंडीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो. मात्र कधीकधी काही ऑटोचालक मध्येच ऑटो थांबवून प्रवाशी घेतात. अशा वेळी मागून येणाऱ्यांना नाहक त्रास होत आहे. त्यामुळे ऑटो चालकांनी नियमानुसार आपले ऑटो चालविल्यास दुसऱ्या वाहनधारकांना त्रास न होता वाहतूक सुरळीत होईल.
बाॅक्स
रिक्षाचालकांची मनमानी
बसस्थान
येथील बसस्थानक परिसरामध्ये नेहमीच ऑटोचालकांची मनमानी बघायला मिळते. प्रशासनाने बसस्थानकाच्या एका बाजूला ऑटो स्टॅन्ड दिले आहे. मात्र येथे न थांबता वाट्टेल तिथे ऑटो लावल्या जाते. विशेषत: न्यायालयाच्या समोरील बाजूलाही मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या कडेलाच ऑटो ठेवल्या जाते. त्यामुळे या परिसरामध्ये नेहमीच वाहतूककोंडी होते.
रेल्वेस्थानक
कोरोना संकटानंतर रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे सध्यास्थितीत या परिसरात ऑटोची संख्या कमी आहे. मात्र कोरोना संकटापूर्वी या परिसरातही ऑटाेचालकांची मनमानीच होती. आपल्यालाच प्रवासी मिळावे यासाठी एका रांगेत ऑटो न आणता रेल्वे आल्यानंतर वाट्टेल तिथे ऑटो उभे ठेवून प्रवाशांना बोलावत असल्याचे दिसून येत होते.
पाणीटाकी परिसर
चंद्रपूर येथील पोस्ट कार्यालयाजवळ बहुतांश बस थांबतात. शहरात जाणे सोईचे होत असल्यामुळे प्रवाशी येथेच उतरतात. मात्र येथेही
आपल्या मनमर्जीने ऑटो ठेवून ऑटोचालक बसमधून उतरणाऱ्या प्रवाशांना ऑटो करण्याची घाई करतात.बाॅक्स
मनमानी भाडे
शहरातील काही रस्त्यांवरून प्रवाशांना जाणे सोयीचे व्हावे यासाठी दर ठरलेले आहे. मात्र नवीन प्रवाशी असला की ऑटोचालक आपल्या मनात येईल. तेवढे पैसे सांगून मोकळे होत आहे. त्यामुळे अनेकवेळा प्रवाशांना भुर्दंड सहन करावा लागत आहे.
बसस्थानक ते गांधी चौक, पाणी टाकी, पडोली, वडगाव, बसस्थानक ते तुकूम, दुर्गापूर, बंगाली कॅम्प आदी रस्त्यावर दर निश्चित आहे. मात्र अनेक वेळा प्रवासी पाहून पैसे घेतले जात आहे.
बाॅक्स
प्रवाशांना त्रास
शहरातील ऑटोमुळे जाण्या-येण्याच्या सुविधा झाला आहे. अनेक वेळा अत्यावश्यक काम असताना ऑटोमुळे लवकर जाणे सोपे झाले आहे. ऑटोचालकांनाही या माध्यमातून रोजगार मिळाला आहे. मात्र काही ऑटोचालक आपल्या मनमर्जीने प्रवाशांकडून पैसे घेतात. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
-नारायण तडस, प्रवाशी चंद्रपूर
कोटो
ऑटोमुळे शहरात कुठेही जाणे शक्य होत आहे. मात्र चालक आपल्या मनमर्जीने प्रवाशांना पैसे सांगून मोकळे होत आहे. त्यामुळे ऑटोला मीटर लावल्यास ऑटो-चालक आणि प्रवाशांमध्ये उडणारे खटके बंद होईल.
- प्रतिभा कोडापे, चंद्रपूर
बाॅक्स
वाहतूक पोलिसांनी लक्ष द्यावे
दिवसेंदिवस शहरात वाहनांची संख्या वाढली आहे. रस्ते लहान आणि वाहनसंख्या अधिक अशी काहीशी अवस्था शहरात बघायला मिळत आहे. अनेक इमारतींमध्ये वाहनतळ नसल्यामुळे काही जण रस्त्याच्या कडेला आपले वाहन पार्क करतात. अशा वेळी अन्य वाहनधारकांना त्रास होतो. विशेषत: वाहतूक पोलीस पेट्रोलिंग करतात. मात्र पाहिजे तशी कारवाई करीत नसल्याने शहरात वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे.