पर्यटनासाठी सोमनाथला प्रवेशद्वाराची उणीव
By admin | Published: April 5, 2015 01:33 AM2015-04-05T01:33:05+5:302015-04-05T01:33:05+5:30
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पासाठी पर्यटकांना मूलवरून जवळपास कोणतेही प्रवेशद्वार नाही.
मारोडा : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पासाठी पर्यटकांना मूलवरून जवळपास कोणतेही प्रवेशद्वार नाही. सोमनाथ व सोमनाथ प्रकल्पास भेट देणाऱ्या देशी व विदेशी पर्यटकांसाठी सोमनाथवरून प्रवेशद्वाराची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी पर्यटकांकडून केली जात आहे.
‘पिकते तेथे विकत नाही व विकते तेथे पिकत नाही’ अशी सोमनाथ पर्यटकांची व परिसरातील नागरिकांची अवस्था झालेली आहे. दरवर्षी सोमनाथ येथे पर्यटनस्थळ म्हणून हजारोच्या संख्येने पर्यटक येत असतात. समाजसेवक बाबा आमटे यांनी निर्माण केलेल्या सोमनाथ प्रकल्पाला भेट देणारे देशी-विदेशी पर्यटक आहेत. विदर्भातील शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी व शिक्षक पर्यटक म्हणून येथे भेटी देतात. गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो पर्यटक सोमनाथला येतात. परंतु त्यांना संलग्न आदिवासी चंद्रपूर जिल्ह्यातील राष्ट्रीय दर्जाचे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात प्रवेश घेता येत नाही.
प्राणी दर्शनासाठी ते आसुसलेले असतात. विशेषत: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघाचे हमखास दर्शन होते, असा असा अनुभव असल्याने फार पूर्वी जिल्ह्याच्या ठिकाणावरून जे प्रवेश बनले तेच कायम आहेत. मूलसारख्या मध्यवर्ती भागातून तेथे पोहचायला दोन ते तीन तास लागतात. तसेच सोमनाथला वेगळी व्यवस्था करावयाची गरज नाही. बफर झोन क्षेत्राचे विशेष वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय मूल येथे आहे. मारोडा येथे क्षेत्र सहाय्यकाचे कार्यालय आहे. येथे लाखो रुपये खर्च करून धर्मशाळा व रिसोर्ट बांधलेले आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष होत आहे. जर प्रवाशांसाठी हे प्रवेशद्वार बनले तर पर्यटनास चालना मिळेल. तसेच सोमनाथ परिसरात अनेकदा व्याघ्रदर्शन होत असते. त्यामुळे प्राणी दर्शकासाठी महत्वाचे ठरेल. त्यामुळे पर्यटन विकास होण्याच्या हेतून सोमनाथ येथून प्रवेशद्वार देण्यात यावे, अशी पर्यटकांची व स्थानिक नागरिकांची मागणी आहे. (वार्ताहर)