पैशांच्या वादातून मुलाचा आई-वडिलांवर कुऱ्हाडीने वार; आईचा घटनास्थळीच मृत्यू, वडील गंभीर

By साईनाथ कुचनकार | Published: February 21, 2024 06:41 PM2024-02-21T18:41:07+5:302024-02-21T18:41:32+5:30

शेतीच्या ठेक्यावरून वाद झाल्याने मुलाने आपल्या वयोवृद्ध आई-वडिलांना खोलीत डांबून कुऱ्हाडीने वार केला.

Son attacks parents with ax over money dispute Mother died on the spot, father in critical condition | पैशांच्या वादातून मुलाचा आई-वडिलांवर कुऱ्हाडीने वार; आईचा घटनास्थळीच मृत्यू, वडील गंभीर

पैशांच्या वादातून मुलाचा आई-वडिलांवर कुऱ्हाडीने वार; आईचा घटनास्थळीच मृत्यू, वडील गंभीर

चंद्रपूर: शेतीच्या ठेक्यावरून वाद झाल्याने मुलाने आपल्या वयोवृद्ध आई-वडिलांना खोलीत डांबून कुऱ्हाडीने वार केला. या घटनेमध्ये आईचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर वडील गंभीर जखमी आहेत. ही घटना बुधवारी २१ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास कोरपना तालुक्यातील लोणी या गावात घडली. कमला पांडुरंग सातपुते (७०) असे मृत आईचे नाव आहे. तर पांडुरंग सातपुते गंभीर जखमी असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मनोज पांडुरंग सातपुते (४५) असे आरोपी मुलाचे नाव आहे.

कोरपना तालुक्यातील लोणी या गावातील पांडुरंग सातपुते यांना दोन मुले आहेत. या दोन्ही मुलांचे विवाह झाले असून, ते वेगवेगळे राहतात. मात्र, मागील काही दिवसांपासून शेतीच्या पैशांवरून या कुटुंबामध्ये वाद होता. बुधवारी वाद विकोपाला गेला. मुलगा मनोजने आई कमला आणि वडील पांडुरंग यांना घरातील एका खोलीत डांबून त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार केला. या घटनेमध्ये आई कमला यांचा मृत्यू झाला तर वडील पांडुरंग सातपुते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर आरोपी मुलाने वहिनीच्या मागे धावून तिलाही मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, लपून बसल्याने तिचा जीव वाचला.

घटनेनंतर मनोजने तेथून पळ काढला. दरम्यान, जखमी अवस्थेत पांडुरंग सातपुते यांना प्रथम कोरपना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले. यासंदर्भात कोरपना पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होऊन पळून गेलेला मुलगा मनोज याला अटक केली. घटनेचा पुढील तपास कोरपना पोलिस निरीक्षक संदीप एकाडे यांच्या मार्गदर्शनात कोरपना पोलिस करीत आहेत.

वहिनी थोडक्यात बचावली...
मनोज याने आपल्या आई-वडिलांवर वार केल्यानंतर वहिनीला देखील मारण्यासाठी तो धावला. याचवेळी वहिनी दुसऱ्या खोलीत गेली आणि आतून दरवाजा बंद केला. यामुळे मनोजच्या तावडीतून ती सुटली.

शेतीच्या पैशांवरून वाद...
पांडुरंग सातपुते यांच्याकडे २० एकर जमीन आहे. या जमिनीच्या ठेक्याच्या पैशांवरून मुलांमध्ये वाद होत असल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे, दोन्ही मुले वेगवेगळी राहतात. तर पांडुरंग सातपुते हे पत्नी कमला यांच्यासोबत वेगळे राहत होते.

Web Title: Son attacks parents with ax over money dispute Mother died on the spot, father in critical condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.