पाऊस येताच रेतीची तस्करी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:19 AM2021-06-17T04:19:45+5:302021-06-17T04:19:45+5:30
तीन महिन्यात एकही टॅक्टरवर कारवाई नाही बल्लारपूर : नुकत्याच बरसलेल्या पावसामुळे नदी नाल्यात रेतीचा भरपूर साठा जमा झाला असून, ...
तीन महिन्यात एकही टॅक्टरवर कारवाई नाही
बल्लारपूर : नुकत्याच बरसलेल्या पावसामुळे नदी नाल्यात रेतीचा भरपूर साठा जमा झाला असून, वाळू तस्करांनी त्यावर डल्ला मारणे सुरू केले आहे. एका दिवसात ३० टॅक्टरद्वारे अंदाजे २०० ब्रास वाळूची तस्करी सुरू असून, या तीन महिन्यांत एकाही ट्रॅक्टरवर तालुक्यातील तलाठ्यांनी कारवाई केली नाही. यामुळे वर्षाकाठी महसूल प्रशासनाचा कोटींचा महसूल बुडत खात्यात जात आहे.
तीन वर्षांपासून बल्लारपूर तालुक्यातील लिलावाचे घोडे अडल्यामुळे रेती घाटाचे लिलाव झाले नाही. बल्लारपूर तालुक्यात पळसगावला दोन, बामणी दुधोली, कोर्टी मक्ता, मोहाडी तुकूम, असे पाच रेतीघाट आहेत. या रेतीघाटाची देखरेख चार तलाठ्यावर आहे, परंतु चालू तीन महिन्यांत एकाही टॅक्टरवर चारही तलाठ्यांकडून दंड आकारण्यात आला नसल्याची माहिती तहसील कार्यालय महसूल विभागाचे अव्वल कारकून अजय मेकलवार यांनी दिली.
तालुक्यातील नाल्यांमध्ये पावसामुळे भरपूर रेतीसाठा जमा झाला आहे. हा साठा पळसगाव, कोठारी, मानोरा, दहेली, जवळील अनेक शेतात व झुडुपात वाळू तस्करांनी रेतीचे ढिगारे करून ठेवले आहेत, परंतु यावर तलाठ्यांकडून कोणतीही दंडात्मक कारवाई होताना दिसत नाही आहे. यासाठी लवकरच एक पथक नेमण्याची माहिती तहसील कार्यालयाने दिली आहे.