सास्ती, कोलगावच्या प्रकल्पग्रस्तांना लवकरच न्याय
By Admin | Published: May 2, 2017 01:01 AM2017-05-02T01:01:26+5:302017-05-02T01:01:26+5:30
जिल्ह्यातील सास्ती येथील भूमिगत कोळसा खाण, कोलगाव कोळसा खाण आदींच्या प्रकल्पग्रस्तांना मोबदला ...
नागपुरात बैठक : केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार निर्णय
चंद्रपूर : जिल्ह्यातील सास्ती येथील भूमिगत कोळसा खाण, कोलगाव कोळसा खाण आदींच्या प्रकल्पग्रस्तांना मोबदला व नोकरी देण्यासंदर्भात वेस्टर्न कोल्ड फिल्डच्या नागपूर येथील मुख्यालयात नुकतीच बैठक झाली. या प्रश्नावर लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन वेकोलितर्फे देण्यात आले आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या निर्देशानुसार निर्णय घेण्याबाबत वेकोलिच्या अधिकाऱ्यांनी सहमती दर्शविली आहे.
सास्ती व कोलगाव कोळसा खाणीच्या प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. या संदर्भात ना. अहीर यांनी गंभीर दखल घेऊन वेकोलि अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर गेल्या आठवड्यात वेकोलिच्या नागपूर येथील मुख्यालयात या प्रश्नावर बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीमध्ये वेकोलिचे कार्मिक निदेशक डॉ. संजीव कुमार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी हे प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्याबाबत वेकोलि विचार करीत असल्याने स्पष्ट केले.
डॉ. संजीव कुमार यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांना दोन्ही प्रकल्पाबाबत आणि प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यावर आश्वास्त करण्यात आल्याची माहिती बैठकीमध्ये दिली. सास्ती भूमिगत खाण ते खुल्या खाणीच्या प्रकल्पग्रस्तांचा मोबदला आणि नोकरी देण्याचा विषय वेकोलिच्या व्यवस्थापन मंडळात मांडण्यात आला आहे.
ना. अहीर मोबदला आणि नोकरीबाबत जे निर्देश देतील, त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल. हे प्रकल्प सुरू करण्यासाठी वेकोलिच्या व्यवस्थापनाकडून लवकरच सकारात्मक कार्यवाही केली जाणार आहे.
या बैठकीला भाजपा जिल्हा सरचिटणीस राहुल सराफ, सास्ती-गोवरीचे जिल्हा परिषद सदस्य सुनील उरकुडे, कोलगावचे सरपंच पुरूषोत्तम लांडे, यवतमाळचे माजी जि.प. सदस्य विजय पिदूरकर, राजुरा तालुका महामंत्री अॅड. प्रशांत घरोटे, भाजपा किसान आघाडीचे राजू घरोटे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)