निर्बंध शिथिल होताच बाजार फुलला, व्यापाऱ्यांतही आनंदोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:35 AM2021-06-09T04:35:42+5:302021-06-09T04:35:42+5:30

चंद्रपूर : दोन महिन्यांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर कोरोना निर्बंध शिथिल होताच सोमवारपासून बाजारपेठ सुरू झाली. त्यामुळे नागरिकांसह, व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य ...

As soon as the restrictions were relaxed, the market flourished and traders rejoiced | निर्बंध शिथिल होताच बाजार फुलला, व्यापाऱ्यांतही आनंदोत्सव

निर्बंध शिथिल होताच बाजार फुलला, व्यापाऱ्यांतही आनंदोत्सव

Next

चंद्रपूर : दोन महिन्यांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर कोरोना निर्बंध शिथिल होताच सोमवारपासून बाजारपेठ सुरू झाली. त्यामुळे नागरिकांसह, व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. दरम्यान, खरेदीसाठी नागरिकांची गर्दी उसळली होती. एकंदरीत बाजारपेठेमध्ये नवचैतन्य आल्याचे बघायला मिळाले. मात्र, काही नागरिकांसह दुकानदारांना कोरोना नियमांचा विसर पडल्याचे दिसून आले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जनजीवन विस्कळीत झाले. मार्च महिन्याच्या अखेरपासून प्रभाव सुरू झाला. त्यानंतर एप्रिलमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्यामुळे लाॅकडाऊन करण्यात आले. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच बंद होते. त्यामुळे बाजारपेठ पूर्णत: ओस पडली होती.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने सोमवारपासून प्रशासनाने शिथिलता दिली. सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्वांना सूट दिल्यामुळे खरेदीसाठी पहिल्याच दिवशी गर्दी उसळली. दोन महिन्यांनंतर पहिल्या दिवशी गल्ला भरल्यामुळे व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले.

शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या गोल बाजारामध्ये सकाळी ९ वाजेपासूनच गर्दी दिसून आली. पावसाळी साहित्यासह हार्डवेअर, पेंट दुकान, पुस्तक, कापड, मोबाइल, स्टेशनरी, मोबाइल केअर सेंटर आदींमध्ये नागरिकांची झुंबड उडाली होती. मात्र, काही नागरिकांसह व्यावसायिकांनी कोरोना नियम धाब्यावर बसवल्याचे दिसून आले. मास्क, सॅनिटायझर न लावताच अनेक नागरिक दुकानात जाताना दिसून आले.

बाॅक्स

चप्पल, मोबाइल, खेळणी, स्टेशनरी, अंतर्वस्त्रांच्या दुकानांत गर्दी

चंद्रपूर : बाजारपेठ सुरू होताच गोल बाजारासह अन्य ठिकाणी सकाळी ९ वाजेपासूनच गर्दी दिसली. यामध्ये चप्पल दुकान, मोबाइल शोरूम, खेळणी साहित्य, स्टेशनरी, कापड, तसेच अंतर्वस्त्रांच्या दुकानांमध्ये झुंबड बघायला मिळाली. यासोबत वाहन दुरुस्तीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर निघाले.

बाॅक्स

सराफा बाजारही चकाकला

सराफा बाजारातही सोमवारी तेजी आल्याचे चित्र बघायला मिळाले. अनेक दुकानांसमोर रांगा लागल्या होत्या. विशेष म्हणजे, काही कुटुंबियांनी लग्न जुळवून ठेवले असून, लाॅकडाऊन उठण्याची वाट बघत होते. यातील बहुतांश जणांनी सोने खरेदीसाठी गर्दी केल्याचे दिसून आले. दरम्यान, दुकानाच्या अगदी समोर बसणाऱ्या मणी, तसेच माळ ओवणाऱ्यांच्या चेहऱ्यावरही हास्य फुलले होते.

बाॅक्स

पावसाळी साहित्य घेण्यासाठी गर्दी

पावसाळा अगदी तोंडावर आला आहे. घरांची दुरुस्ती, तसेच पावसाळ्यापूर्वी करायच्या कामालाही सुरुवात झाली आहे. अनलाॅक होताच पावसाळी साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची दुकानांमध्ये गर्दी होती. यामध्ये प्लास्टिक, ताडपत्री आदी खरेदी करताना नागरिक दिसत होते. दरम्यान, हार्डवेअर, तसेच प्लम्बिंगशी निगडित दुकानातही बऱ्यापैकी गर्दी झाली होती.

बाॅक्स

थंडावलेले आर्थिक चक्र पुन्हा सुरू

मागील दोन महिन्यांपासून थंडावलेले अर्थचक्र सोमवारी सकाळपासून सुरू झाले. त्यामुळे व्यापारी, दुकानदारांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. एकूणच बाजारात नवचैतन्य आल्याचे चित्र सोमवारी सकाळी बघायला मिळाले. लाॅकडाऊननंतर सोमवारी अनेकांचा गल्ला बऱ्यापैकी भरल्याने त्यांच्यातून समाधान व्यक्त करण्यात आले.

बाॅक्स

या ठिकाणी उसळली गर्दी

गोलबाजार, गंजवार्ड, कापड दुकान, बँका, महाविद्यालय, मोबाइल दुकान, पावसाळी साहित्य विक्रीची दुकाने, सोने-चांदी, चप्पल दुकान, कृषी केंद्र, हाॅटेल आदी.

Web Title: As soon as the restrictions were relaxed, the market flourished and traders rejoiced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.