ठाणेदाराचे आश्वासन फोल ठरताच, महिलांचा दारूबंदीसाठी एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:31 AM2021-09-21T04:31:07+5:302021-09-21T04:31:07+5:30
सकमुर (चेकबापूर) गावात कायदा व सुव्यवस्था भंग होऊन, अवैद्य दारू विक्री व्यावसायिकांनी डोके वर काढले. आबालवृद्ध व तरुण पिढी ...
सकमुर (चेकबापूर) गावात कायदा व सुव्यवस्था भंग होऊन, अवैद्य दारू विक्री व्यावसायिकांनी डोके वर काढले. आबालवृद्ध व तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाऊ लागली. दरम्यान, लाठी पोलीस स्टेशन हद्दीतील सकमुर गावात अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपस्थित नव्याने रुजू झालेले लाठीचे ठाणेदार मिलिंद पारटकर यांना गावातील महिलांनी दारूबंदी करण्याची मागणी केली. यावर उत्तर देत ठाणेदार पारटकर यांनी आपण नव्याने सूत्र घेतल्याचे सांगत लवकरच संपूर्ण गावात पूर्ण दारूबंदी केला जाईल, असे आश्वासन दिले. या आश्वासनाला पंधरा दिवसांवर कालावधी लोटला आहे. गावात अवैध दारू विक्री जोमात सुरू असल्याने, अखेर तीनशेहून अधिक महिलांनी स्वाक्षरी अभियान राबवून गावात दारूबंदीसाठी सरपंच यांना निवेदन सादर केल्याची माहिती सरपंच अपर्णा रेचनकर यांनी दिली आहे. यावर आगामी काही दिवसांत पोलीस प्रशासनाने गावातील अवैध दारू विक्रीच्या विरोधात कठोर कारवाईची भूमिका न घेतल्यास महिलांचे मोठे जनआंदोलन उभारू, असा इशारा सरपंच अपर्णा रेचानकर यांनी दिला आहे.
बॉक्स
सकमुर (चेकबापूर) गावात दारूबंदी काळात लगतच्या तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या दारू तस्करी होत आहे. दारूबंदी उठताच, राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन येथून आजही मुबलक प्रमाणात देशी व विदेशी दारूचा पुरवठा करण्यात येत आहे. मात्र, दारू तस्करांना पकडण्यात पोलिसांना यश का आले नाही, असा प्रश्न गावकऱ्यांकडून विचारला जात आहे.