दोनशे मुलांना अत्याधुनिक प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:36 AM2018-04-23T00:36:23+5:302018-04-23T00:36:31+5:30
मत्स्य व्यवसायासंदर्भात चंद्रपूरमध्ये राज्य शासनामार्फत सुरू असलेल्या वेगवेगळ्या उपाययोजनांना अधिक गतीशील करण्यात येईल. त्यातून राज्याच्या पूर्व भागात गोडया पाण्यात मत्स उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या भोई समाजाला अधिक सशक्त करण्यात येईल.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मत्स्य व्यवसायासंदर्भात चंद्रपूरमध्ये राज्य शासनामार्फत सुरू असलेल्या वेगवेगळ्या उपाययोजनांना अधिक गतीशील करण्यात येईल. त्यातून राज्याच्या पूर्व भागात गोडया पाण्यात मत्स उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या भोई समाजाला अधिक सशक्त करण्यात येईल. त्यासाठी समाजातील २०० मुलांच्या आधुनिक प्रशिक्षणाबाबत शासन स्तरावर विचार करण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे वित्त नियोजन व वने मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी शिष्टमंडळाला दिले.
जिल्ह्यातील पारंपारिक मत्स्यव्यवसायाला आपल्या कष्टाने जपणाऱ्या भोई समाजाच्या एका शिष्टमंडळाने विविध मागण्यांसाठी शनिवारी रात्री ना. सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. नियोजन भवनात या समाजाच्या मान्यवरांनी आपल्या विविध समस्या त्यांच्यापुढे मांडल्या. यावेळी वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, आ. नाना श्यामकुळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल पावडे , डॉ. दिलीप शिवरकर, बंडू हजारे, नगरसेवक राजीव गोलीवार, अरूण तिखे यांच्यासह भोई समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये या समाजाच्या विविध संस्थांच्या संदर्भातील कामकाजाचा आढावा सादर करण्यात आला. जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या मत्स्यव्यवसायाच्या संदर्भातील शासकीय प्रयत्न व त्याला मिळणारा प्रतिसाद यावरही चर्चा झाली. भोई समाजाच्या मासेमारी संदर्भातील शीर्ष संस्थांना कार्यालय स्थापनेबाबत मदत करणे, कौशल्य विकास विभागांतर्गत त्यांना मदत करणे, यासंदर्भात चर्चा झाली. मासेमारीच्या अत्याधुनिक प्रशिक्षणासोबतच मत्स्य निर्मिती आणि संगोपनाबाबतही आधुनिक तंत्रज्ञानाने स्थानिक भोई समाजाला अधिक प्रगत करण्याबाबत काही मागण्या पुढे आल्या. राज्य शासन मत्स्यव्यवसायाच्या प्रगतीसाठी आग्रही असून राज्याला लाभलेल्या विपुल समुद्र किनाºयासोबतच चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये असणारऱ्या पारंपारिक तलावातील मच्छीमारीमुळे राज्याच्या मत्स्य व्यवसायात भर पडत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मुंबईमध्ये मच्छीमारी व्यवसायाची जुळलेल्या अनेक समाजाने या व्यवसायात मारलेल्या भरारीबाबत शिष्टमंडळाला अवगत केले.
यावेळी त्यांनी प्रशिक्षणासंदर्भात २६ एप्रिलला बैठक लावण्यात येत असल्याचे सांगितले.
१६ हजार मेट्रिक टन उत्पादन अपेक्षित
राज्यात समुद्र किनाऱ्याच्या मच्छीमारीनंतर पूर्वेकडील चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यात तलावाच्या पाण्यामध्ये मासेमारी करण्याचा मोठ्या प्रमाणात उद्योग होतो. एकट्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सरासरी ९ हजार २०३ मेट्रीक टन मत्स्योत्पादन सध्या होत आहे. जिल्ह्याने १३ हजार ३३६ मेट्रिक टन उद्दिष्ट घेतले आहे. जिल्ह्यामध्ये ५० टक्के जनता मांसाहारी आहे. त्यामुळे जवळपास १६ हजार मेट्रिक टनावर मासोळीचे उत्पादन अपेक्षित आहे, असेही यावेळी ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.