नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत वन्यप्राण्यांसाठी ठरले वरदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 01:11 AM2018-05-09T01:11:06+5:302018-05-09T01:11:06+5:30
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या मूल वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची आवश्यकता भासत असते. वन्यप्राण्यांसाठी पुरेसे पाणवठे असले तरी नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत वन्यजीवांना संजीवनी देणारे ठरले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या मूल वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची आवश्यकता भासत असते. वन्यप्राण्यांसाठी पुरेसे पाणवठे असले तरी नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत वन्यजीवांना संजीवनी देणारे ठरले आहे.
महाराष्ट्र शासनाने बफर व कोअर अशी विभागणी करून ताडोबा अंधारी-व्याघ्र प्रकल्पात सहा परिक्षेत्रांची निर्मिती केली. यात मूल परिक्षेत्रात ९६.७० चौ.कि.मी. क्षेत्र राखीव ठेवण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात जंगलाचे क्षेत्र असल्याने वन्यप्राण्यांचा वावरही लक्षवेधी असल्याचे या परिक्षेत्रात दिसून येते. पावसाळा व हिवाळा या दोन ऋतुंमध्ये वन्यप्राण्यांना पाण्याची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी जलस्त्रोत उपयुक्त ठरत आहेत. उन्हाळ्यात पाण्याची पातळी खोल गेल्यास जंगलाजवळील काही भागात पाणी मिळणे दुरापास्त होते़ पाण्यासाठी वन्यप्राण्यांची भटकंती सुरू असते. वनविभागाने काही ठिकाणी सौरपंप बसवून पाण्याची सोय उपलब्ध करून दिली. जंगलाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने वन्यप्राण्यांना पाण्याची आवश्यकता भासते़
सोमनाथ, भादुर्णी परिसरात तलाव असून त्यातील पाण्याचा आता उपयोग होत आहे. पडझरी, शिवापूर चक या परिसरात नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत असल्याने समस्या सुटली. डोंगरदऱ्यातून बरेच पाणी झिरपते. त्यातून वन्यप्राण्यांना तृषा भागविता येते. या परिक्षेत्रातील बारमाही वाहणाऱ्या झऱ्यांमुळे वन्यप्राण्यांची अडचण दूर झाली आहे.
झऱ्यामुळे टळले जलसंकट
उन्हाळ्यात पाण्याचे स्त्रोत कमी होतात. पण, मूल वन क्षेत्रातील झऱ्यातून पाणी सतत वाहत असल्यामुळे वन्य प्राण्यांना तृष्णा भागविणे शक्य झाले़ वन्यप्राण्यांची भटकंती थांबली. यासाठी नैसर्गिक जल स्त्रोत महत्त्वाचे ठरले आहेत. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मूल बफर झोनमध्ये पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत मुबलक प्रमाणात असल्याने वन्य प्राण्यांसाठी वरदानच ठरत असल्याचे दिसून येत आहे़