जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दाक्षिणात्य संस्थांचा विळखा
By admin | Published: July 14, 2014 11:52 PM2014-07-14T23:52:02+5:302014-07-14T23:52:02+5:30
गेल्या पाच वर्षांपासून पश्चिम विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ या तीन जिल्ह्यातील औद्योगिकदृष्ट्या विकसित पट्ट्यातील पालकांना विविध फसवी शैक्षणिक आमिषे दाखवून आंध्र प्रदेशातील अनेक
कुचना : गेल्या पाच वर्षांपासून पश्चिम विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ या तीन जिल्ह्यातील औद्योगिकदृष्ट्या विकसित पट्ट्यातील पालकांना विविध फसवी शैक्षणिक आमिषे दाखवून आंध्र प्रदेशातील अनेक शिक्षण संस्थांच्या दलालांकडून मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे.
दक्षिण भारतातील प्रामुख्याने हैदराबाद, सिकंदराबाद आणि विजयवाडा ही शहरे त्यांच्या भाषिक आधारावर त्यांच्यापुरती ‘एज्युकेशनल हब’ बनली. दर्जेदार सीबीएसई, एनआयआयटी, इंजिनिअरिंग, मेडिकल पदव्यांच्या पूर्व प्राथमिक शिक्षणाचे आमिष दाखवून मध्यम तथा श्रीमंत पालक, नोकरी करणाऱ्या कुटुंबातील मुलांची सर्व नियम धाब्यावर बसवून दलालांमार्फत अक्षरश: पळवा- पळवी सुरू केली आहे. दरवर्षी हा प्रकार दरवर्षीच्या जानेवारी- फेब्रुवारीपासून सुरू होतो.
या शहरातून अनेक दलाल आपापले लक्ष्य शोधण्यासाठी विदर्भात येत असून दर्जेदार शिक्षण, शाळा- महाविद्यालयाच्या आकर्षक इमारतींचे फोटो, निकालांची टक्केवारी, राष्ट्रीय खेळात चमकलेले विद्यार्थी, यासर्व बाबींसह शालेय इमारत, वसतिगृहाची हायटेक व्यवस्था, महाराष्ट्रीयन जेवणाची सुरेख व्यवस्था या सर्व बाबीत आपण कसे पुढे आहोत, हे सांगून बव्हंंशी मराठी माध्यमांच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कसलीही प्रवेशपूर्व परीक्षा न देता सरळ सीबीएसईच्या वर्गात प्रवेश दिला जातो. त्यासाठी सत्तर हजारांपासून तर सव्वा दोन लाख प्रतिवर्ष फी आकारली जाते.
या हायटेक शिक्षण सम्राटांकडून प्रवेश अर्जासह मिळणारे माहितीपत्रक दीड ते दोन हजारांच्या दरात असून एकदा विद्यार्थी आपल्या शाळा- महाविद्यालयात आला की, मग शिक्षकांसह वसतिगृहातील कर्मचारी भाषिक लॉबी तयार करून विद्यार्थ्यांचा शारिरीक व मानसिक छळ करतात, असा अनुभव अनेक पालकांना आला आहे. याशिवाय मेडिकल अॅडव्हास, शैक्षणिक सहल, स्कूल खर्च, वार्षिक, सहामाही, तिमाही, पालकसभा खर्च आदी विविध कारणे दाखवून पालकांची आर्थिक लुट केली जाते.
उज्ज्वल भविष्य घडविण्याच्या नादात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याचे तेथील वातावरणात मन रमले नाही तर तो शिक्षण अर्धवट सोडून परत येतो. तोपर्यंत महाराष्ट्रीतील प्रवेश प्रक्रिया बंद होऊन शैक्षणिक अभ्यासक्रमसुद्धा पुढे गेलेला असतो. प्रवेश फी परत मिळणार नाही, ही चिंंता सोडून शैक्षणिक सत्र वाया जाणार नाही ना, याची चिंता संबंधित पालकाला पडते. जबरदस्तीने एखादा विद्यार्थी तेथे शिकला तरी भाषा, संस्कृती, खानपान कौटुंबिक जिव्हाळा प्रेम या सर्व बाबीपासून तो दुरावला जातो.
जिल्ह्याचा शिक्षण विभाग कायद्याने या विषयात काहीही करता येत नसल्याचे सांगून जिल्हा व राज्य बदलण्यासाठी पालकांना बिनदिक्कतपणे परवानगी देत आहे. किमान अशा फसव्या शैक्षणिक दलालांना आवर घालण्यासाठी राज्य शासनाने शैक्षणिक स्थलांतर कायदा बनविण्याची गरज, फसगत झालेल्या अनेक पालकांनी व्यक्त केली आहे. एकूणच नागपूर-पुण्याला शिकविण्याची हौस सध्यातरी संपुष्टात येत असून आता पालकांचा मोठा वर्ग दक्षिणात्यांच्या शैक्षणिक विळख्यात फसत चालला आहे. (वार्ताहर)