टाकाऊ वस्तूंपासून पेरणी यंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 06:00 AM2019-10-27T06:00:00+5:302019-10-27T06:00:38+5:30
पावसाळ्यात वापसा (वाळाणी) लवकर येत नसल्याने औताद्वारे पिकाला रासायनिक खत देता येत नाही. वेळेवर मजूरसुद्धा उपलब्ध होत नाही. यासाठी प्रा.विलास कोटगिरवार यांनी टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ असे रासायनिक खत पेरणी यंत्र तयार केले आहे.
सचिन सरपटवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : शेती बेभरोशाची आहे. तोट्यात आणणारी आहे, असे म्हणणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मात्र नवनवीन तंत्रज्ञान वापरून आधुनिक शेतीद्वारे आर्थिक स्थिती मजबुत करता येते, हे येथील शेतकरी विलास कोटगिरवार यांनी दाखवून दिले आहे. त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान शेतात वापरलेच, सोबतच टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ खत पेरणी यंत्र तयार केले आहे. या पेरणी यंत्राद्वारे त्यांनी शेतकऱ्यांसमोर प्रगत शेतीसाठी नवे दालन उघडले आहे.
पावसाळ्यात वापसा (वाळाणी) लवकर येत नसल्याने औताद्वारे पिकाला रासायनिक खत देता येत नाही. वेळेवर मजूरसुद्धा उपलब्ध होत नाही. यासाठी प्रा.विलास कोटगिरवार यांनी टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ असे रासायनिक खत पेरणी यंत्र तयार केले आहे. त्यामुळे मजुरांकरवी रासायनिक खत देण्यापेक्षा या खत परेणी यंत्राद्वारे रासायनिक खत देता येते व नंतर डवऱ्याद्वारे रासायनिक खत जमिनीत गाडता येते. प्रा. विलास कोटगिरवार यांची भद्रावती ते तेलवासा रस्त्यालगत स्वत:ची शेती आहे. त्यांनी भंगारमध्ये टाकलेला हायटेक फवारणी पंप घेतला. त्याची फक्त टाळी तेवढी घेतली. बाकी सर्व जोडणी काढून टाकली. पंपाच्या टाकीला मागच्या बाजूने खाली छिद्र पाडून पाऊन इंची पिव्हीसी एमटीए बसविले. रासायनिक खत नियंत्रित करण्याकरिता त्याला एक व्हॉल्व बसविला. त्याखाली पाऊन इंची टी लावली. टिच्या बाजूला रिड्युसर बसवून त्याला रिड फटरबरी पाईप बसविला व पुढे अर्धा इंची पिव्हीसी पाईप चार फूट दोन्ही बाजूने बसवून रासायनिक खत देण्याचे पेरणी यंत्र तयार केले. यासाठी त्यांना फक्त ३५० ते ४०० रुपये खर्च आला. पंपामध्ये रासायनिक खत टाकण्यासाठी ग्लायफोसेरची पाच लिटरची कॅन खालून कापून चाडी म्हणून वापरण्यात आली. प्रा.विलास कोटगिरवार यांनी अत्यंत कमी खर्चात तयार केलेल्या या यंत्राचा शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होवू शकतो.
एकीकडे शेती परवडत नाही, अशी बोंब होत आहे. मात्र पूर्ण वेळ शेती व्यवसायात गुंतून त्यात नवनवीन बदल व नव्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेती फायद्याची ठरू शकते.