चिमूर तालुक्यात हजारो हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी
By admin | Published: October 21, 2014 10:49 PM2014-10-21T22:49:09+5:302014-10-21T22:49:09+5:30
जिल्ह्यात मागील अनेक महिन्यांपासून वरुन राजाने अवकृपा दाखविल्याने यावर्षात खरीप हंगामातील सोयाबीनचे नगदी पीक शेतकऱ्यांच्या हातातून हिरावले. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारमय झालेली आहे.
खडसंगी : जिल्ह्यात मागील अनेक महिन्यांपासून वरुन राजाने अवकृपा दाखविल्याने यावर्षात खरीप हंगामातील सोयाबीनचे नगदी पीक शेतकऱ्यांच्या हातातून हिरावले. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारमय झालेली आहे. मात्र, खरीप पिकाची भरपाई रब्बी पिकातून काढण्याच्या तयारीला सद्या शेतकरी लागला असून रब्बी पिकाच्या मशागतीला सुरुवात केल्याचे चित्र चिमूर तालुक्यात पाहावयास मिळत आहे.
यावर्षी खरीप हंगामाला पावसाने सुरुवातीला चांगलाच दगा दिल्याने जुलैपर्यंत सोयाबीन व कापसाच्या अत्यल्प पेरण्या झाल्या होत्या. मात्र आॅगस्टमधील पावसामुळे खरीपातील सोयाबीन व कापूस ६५ ते ७० टक्के पेरण्या झाल्या. सद्या तालुक्यात रब्बी हंगामासाठी पेरणीपूर्व मशागतीची लगबग सुरू झाली आहे. मागील महिन्यात काही गावात आलेल्या पावसाने शेतकऱ्यांना सुखावले.
चिमूर तालुक्यात रब्बीची सर्वाधिक पेरणी खडसंगी, आमडी, भिसी, शंकरपूर, बोथली, महालगाव या गावात जास्त प्रमाणात करण्यात येते. कृषी विभागाने देखील खरीपातील कमी पेरण्याच्या पार्श्वभूमीवर यंदा रब्बी पिकासाठी जवळपास हजारो हेक्टर क्षेत्रावरील पेरणीचे नियोजन केले आहे. तालुक्यात रब्बीच्या गहू, चना, लाख पेरणीसाठी जमीन तयार झाल्या असून अल्प प्रमाणात शेतकऱ्यांनी खरीप पिकाची काढणी उखरताच आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात पेरणीला मोठ्या प्रमाणत वेग येणार आहे.
यावर्षात वरुन राजाने अवकृपा दाखविल्याने शेततळे, तलावात पाण्याचा साठा कमी प्रमाणात आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी पाण्याच्या चिंतेत आहे. तालुक्यात सिंचनाच्या कुठल्याही सुविधा नसल्याने शेतकऱ्यांना निसर्गावरच अवलंबून राहावे लागत असल्याने बळीराजा चिंतेत आहे. मात्र खरीप हंगामात झालेल्या नुकसानीची भरपाई या रब्बी हंगामात काढण्याच्या आशेवर तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात मशागतीचे कामे करीत आहेत. मात्र या विंवचनेतून निघण्यासाठी सद्या शेतकऱ्यांची भिस्त रब्बी हंगामावरच अवलंबून असल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे. (वार्ताहर)