साडेचार लाख हेक्टर क्षेत्रावरील पेरणी खोळंबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2022 05:00 AM2022-06-25T05:00:00+5:302022-06-25T05:00:18+5:30
पावसाअभावी सुमारे तीन हजार हेक्टरवर पेरणी झाली तर उर्वरित साडेचार लाख हेक्टर क्षेत्रातील पेरण्या खोळंबल्या. हंगाम टळला तर उत्पादन घटेल आणि पेरणी केली तर दुबारचे संकट ओढवेल, या धास्तीमुळे शेतकरी मुसळधार पावसाची प्रतीक्षा करत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात चार लाख ४५ हजार ९९६ हेक्टर क्षेत्रापैकी केवळ तीन हजार १६९ हेक्टर क्षेत्रावरच पेरण्या झाल्या. त्याची टक्केवारी ०.७१ टक्के इतकी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मान्सून बरसला मात्र गतवर्षीच्या तुलनेत पुरेसा पाऊसच पडला नाही, हे आतापर्यंत नोंदविलेल्या ९३.८० मि. मी. पावसातून स्पष्ट झाले. पावसाअभावी सुमारे तीन हजार हेक्टरवर पेरणी झाली तर उर्वरित साडेचार लाख हेक्टर क्षेत्रातील पेरण्या खोळंबल्या. हंगाम टळला तर उत्पादन घटेल आणि पेरणी केली तर दुबारचे संकट ओढवेल, या धास्तीमुळे शेतकरी मुसळधार पावसाची प्रतीक्षा करत आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात चार लाख ४५ हजार ९९६ हेक्टर क्षेत्रापैकी केवळ तीन हजार १६९ हेक्टर क्षेत्रावरच पेरण्या झाल्या. त्याची टक्केवारी ०.७१ टक्के इतकी आहे.
१,४२६ हेक्टर क्षेत्रात पऱ्हे भरले
धानाचे प्रत्यक्ष क्षेत्र एक लाख ८४ हजार २९० हेक्टर आहे. त्यापैकी केवळ एक हजार ४२६ हेक्टरवर धानाच्या पेरण्या झाल्या. त्याची टक्केवारी ०.८३ टक्के आहे. सोयाबीनचे प्रत्यक्ष क्षेत्र ६५ हजार ६२ इतके आहे. पाऊस न झाल्याने सोयाबीनची लागवड झालेली नाही.
जिल्ह्यात ९३.८० मिमी पाऊस बरसला
- मूल, सावली, सिंदवाही, ब्रह्मपुरी, नागभीड तालुक्यांत भातशेती केली घेतले. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान एक हजार १४० मिमी आहे. १ ते २३ जूनपर्यंतच पावसाने हजेरी लावली. त्याची सरासरी ९३.८० मिमी आहे. २३ दिवसात केवळ ५१.१२ टक्के पाऊस पडला. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत.
कापूस लागवडीवरही अनिष्ट परिणाम
कापसाचे प्रत्यक्ष क्षेत्र एक लाख ७७ हजार ३८५ हेक्टर आहे. त्यापैकी एक हजार ७४३ हेक्टरवर लागवड करण्यात आली. केवळ चंद्रपूर आणि राजुरा तालुक्यांत कापसाची लागवड केली आहे. अन्य तालुक्यांमधील शेतकरी पावसाकडे डोळे लावून बसले आहेत.
गतवर्षी २३ जूनपर्यंत १५६ मिमी
चंद्रपूर जिल्ह्यात गतवर्षी २३ जूनपर्यंत १५६ मिमी पाऊस बरसला होता. मात्र, यंदा केवळ ९३.८० मिमी पडल्यामुळे शेतकरी हैराण झाला आहे.